पत्रकार परिषद घेवून दिली माहिती
बीडदि.23 ः शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी हाबुक ठोकली आहे. त्यासाठी त्यांनी सरपंच उपसरपंच संघटनेची स्थापना केली असून तिचा महाराष्ट्रभर विस्तार करणार असल्याचे जाहीर करत येणारी बीड विधानसभा निवडणूक लढविणार असल्याबाबत मंगळवारी (दि.23) त्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेवून याबाबत माहिती दिली.
पुढे बोलताना कुंडलिक खांडे म्हणाले की, स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर हा निर्णय घेत आहे. कारण माझी राजकीय सुरुवात त्यांच्यापासून झालेली आहे. गेल्या 20 वर्षापासून म्हाळसजवळा ग्रामपंचायत माझ्या ताब्यात असून मी राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे सरपंचांना येणार्या अडचणी मला माहिती आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी ठिकाणी सरपंचांना अनेक अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी सरपंच उपसरपंच संघटनेची स्थापना करत आहे. या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम करणार आहे. त्याची पूर्ण तयारी केली असून लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्यात पदाधिकारी नेमणार आहे. राज्यातील प्रत्येक सरपंच या संघटेनला जोडला गेला पाहिजे यासाठी काम करणार आहे. तसेच या संघटनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फायदा व्हावा ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठीही काम करणार असल्याचे खांडे म्हणाले.
बीड विधानसभेची संधी
हुकली; आता लढवणार
विधानसभेला बीडची जागा शिवसेनेकडे आहे. मी मागीलवर्षी विधानसभा लढविणार होतो, त्याअनुषंगाने पुर्ण तयारीही केली होती, मात्र ऐनवेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसारग यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. पक्षाने दिलेला आदेश मानत त्यांचे इमानेइतबारे काम केले. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. यावेळी मात्र मी सरपंच संघटनेच्यावतीने 2024 ची निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही कुंडलिक खांडे यांनी सांगितले.
सरपंच संघटनेचे बीड जिल्हाप्रमुख
म्हणून परमेश्वर तळेकर यांची निवड
या पत्रकार परिषदेत कुंडलिक खांडे यांनी सरपंच उपसरपंच संघटनेची स्थापना केल्याचे जाहीर केले. तसेच या संघटनेचा बीड जिल्हाप्रमुख म्हणून शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा केतुर्याचे सरपंच परमेश्वर तळेकर यांची निवड करत त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र दिले. लवकरच इतरही कार्यकारीणी जाहीर करणार असल्याचे खांडे यांनी सांगितले.