जालन्यातील भाजप पदाधिकार्यास मारहाण प्रकरण
जालना दि.28 ः जालना शहरातील एका खाजगीर रुग्णालयामध्ये रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती. यावेळी पोलीसांनी तिथे धाव घेत गोंधळ घालणार्यांना मारहाण करत गवळी समाजाबद्दल अपशब्द वापरले होते. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद करणार्या भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस शिवराज नारियलवाले याला डीवायएसपी, पोलिस निरीक्षक व अन्य कर्मचार्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर नुकताच व्हायरल झाला होता. चोहोबाजूंनी पोलिसांवर टिकेची झोड आणि कारवाईची मागणी झाल्यानंतर अखेर शुक्रवारी (दि.28) या प्रकरणी पोलिस अधिक्षकांनी पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमीत सोळंके या तीघांसह महेंद्र भारसाखळे होमगार्ड यांना निलंबित केले आहे. मात्र वरिष्ठ असणारे डीवायएसपी व पोलीस निरीक्षक यांच्यावर मात्र काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
जालन्यात भाजपच्या पदाधिकार्याला सात ते आठ पोलिस कर्मचारी लाठ्या-काठ्या आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये दोन लाखांची लाच घेतल्याच्या प्रकरणात अडकलेले जालन्याचे डीवायएसपी सुधीर खिरडकर व त्यांच्यासह अन्य सात-आठ पोलिस कर्मचार्यांनी भाजप पदाधिकारी शिवराज नारियलवाले याला बेदम मारहाण केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद काल उमटले. अनेक भाजप नेत्यांनी या घटनेचा निषेध करतांनाच संबंधित पोलिसांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली होती.
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह अनेकांनी हे प्रकरण गंभीरपणे घेत या विरोधात निदर्शने देखील केली होती. माजी मुख्यमत्री तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही? असा सवाल करत मुख्य्मंत्र्यांनी या प्रकणात लक्ष घालून संबंधितावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यानंतर काही वेळानेच गृहविभागाने या प्रकरणात पोलिस निरीक्षकासह, तीन कर्मचारी व एका होमगार्डला निलंबित केल्याचे जाहिर केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, यांच्यासह काही पोलीस कर्मचार्यांनी ही मारहाण केल्याचं व्हिडिओत दिसून आले होते. मात्र फक्त कर्मचार्यांवर कारवाई करुन अधिकार्यांची मात्र यामध्ये पाठराखण केल्याचे दिसून येत आहे.