बार्टीच्या विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण 10 व्या दिवशी मागे

न्यूज ऑफ द डे परळी

ना.धनंजय मुंडेंनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

परळी : बार्टीचे विद्यार्थी गेल्या 10 दिवसापासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या गावात तहसील कार्यालयाच्या प्रांगणात साखळी उपोषणसाठी बसले होते. आता हे उपोषण 6 जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आले असल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. याबाबतचे लेखी परळीचे नायब तहसीलदार बाबू रूपनर यांच्याकडे दिले आहे. आता मागण्यांबाबत 6 जानेवारीला बैठक होणार असून या बैठकीकडे या विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे.

  याआधी उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या विद्यार्थ्यांची धावती भेट घेतली होती. या अधुर्‍या भेटीने विद्यार्थ्यांत नाराजी पसरल्याचे उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले होते. मात्र आज उपोषणाच्या 10 व्या दिवशी मंत्री मुंडे यांनी वेळ काढत या बसलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे व मागण्यांवर सविस्तर चर्चा करत विद्यार्थ्याना सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र 6 जानेवारीपर्यंत मागण्या झाल्यावरच हे उपोषण रद्द केले जाईल अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास 6 तारखेपासून हे उपोषण आणखी तीव्र स्वरूपाचे करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी लेखी स्वरूपात सांगितले आहे. 194 विद्यार्थ्यांचे भवितव्य हे 6 जानेवारीला होणार्‍या बैठकीवर अवलंबून असून या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tagged