योगी सरकार बरखास्त करा; रिपाइंची मागणी

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरुणी मनिषा वाल्मिकी हिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणार्‍या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी शनिवारी (दि.3) युवा रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी योगी सरकार बरखास्त करा अशा घोषणा देण्यात आल्या.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरुणीवर सामूहिक अत्याचार करुन तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या माणुसकीला काळिमा फासणार्‍या निंदनीय घटनेचा रिपाइंच्यावतीने जाहिर निषेध करण्यात येत असून या प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. सदरील हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करुन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, हाथरस अत्याचार प्रकरणी रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले चिडीचूप असल्यामुळे राजकीय पक्षांकडून टिका करण्यात येत होती. तशा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. अखेर रिपाइंकडून योगी सरकार बरखास्त करण्याची मागणी युवा रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

Tagged