विवेक रहाडे आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण; सुसाईड नोट बनावट

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : तालुक्यातील केतुरा येथील विवेक रहाडे (वय 18) याच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. त्याच्या आत्महत्येचा फायदा घेण्यासाठी त्याची बनावट सुसाईड नोट तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ती सुसाई नोट लिहणार्‍या अज्ञात व्यक्तीविरोधात बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फौजदार सुरेश माळी यांनी दिली फिर्याद नोंदविली असून त्यामध्ये म्हटले की, मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता. शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने 15 दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. पण पेपर कठीण गेल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळतील की नाही? याची चिंता त्याला सतावत होती. या तणावातून त्याने बुधवारी (दि.30 सप्टेंबर) दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवेकने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असून मृत्युपूर्वी त्याने तशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता जप्त करण्यात आलेली सुसाईड नोट आणि अभ्यासक्रमातील वह्यांचे हस्ताक्षर औरंगाबादच्या हस्ताक्षर तज्ञांकडून तपासले. त्यावरून सुसाईड नोट बनावट असल्याचे उघड झाले. विवेकच्या मृत्यूचा फायदा घेत त्याच्या नावे बनावट सुसाईड नोट तयार केली. ती सुसाईड नोट सोशल मीडियाद्वारे व्हायरल करत सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि.सुजीत बडे हे करीत आहेत.

Tagged