pawar

पडळकरांविषयी सविस्तरच बोलेन

न्यूज ऑफ द डे पश्चिम महाराष्ट्र राजकारण

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी खालच्या स्तरावर जाऊन भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. त्यावर पवारांनी मौन सोडलं आहे. मला गोपीचंद पडळकरांविषयी बोलायचं आहे. पण आता बोलणार नाही. सविस्तरच बोलेन, असं शरद पवार म्हणाले. पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाची उत्सुकता ताणली गेली आहे. तसेच पवार पडळकरांबाबत काय गौप्यस्फोट करणार याकडेही सर्वांचं लक्षं लागलं आहे.

शरद पवार काल पुण्यातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांनी पवारांना पडळकरांविषयीचा थेट प्रश्न विचारला. त्यावेळी पवार थांबले आणि त्यांनी मला पडळकरांविषयी बोलायचं आहे. त्यांना निश्चितच मी उत्तर देणार आहे. पण आता नाही. नंतर त्यांच्याविषयी सविस्तर बोलेल, असं सांगत तूर्तास या प्रश्नावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. तीन दिवसांपूर्वी सोलापूर येथे आले असता पडळकरांनी पवारांविषयी अत्यंत वादग्रस्त विधान केलं होतं. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. त्यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला. छोट्या समूहाला भडकवायचं आणि लढवायचं हेच धोरण त्यांनी राबवलं आहे. त्यांनी 60 बहुजन समाजाला झुलवत ठेवून राज्य केलं आहे. गेल्या 60 ते 70 वर्षांत त्यांनी बहुजन नेतृत्वाला पुढे येऊ दिले नाही, असं सांगतानाच पवारांकडे विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही, अशी टीका पडळकरांनी केली होती. पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह असतील असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही येत्या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरू, असं सांगतानाच कोरोनाचं संकट गेल्यानंतर धनगर आरक्षणासाठी राज्यभरातील तरुण रस्त्यावर उतरतील, असंही त्यांनी सांगितलं होतं. पवार नाशिकला अवकाळी पाऊस झाल्यानंतर गेले. कोकणात वादळानंतर गेले. पण अद्याप नुकसानग्रस्तांना मदत मिळाली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता. पडळकरांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र भर पडसाद उमटले होते. ठिकठिकाणी त्यांचे पुतळेही जाळण्यात आले होते. पडळकरांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. तसेच पडळकर यांच्याविरोधात बारामती आणि शिरुर कासारमध्ये गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मात्र पडळकर यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं विधान केलं होतं. या पार्श्वभूमीवर पवारांनी सूचक वक्तव्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं त्याकडे लक्ष लागलं आहे.

Tagged