ऊसतोड मजूर जखमी; संतापलेल्या ग्रामस्थांनी दारुड्यास दिला जबर चोप
तालखेड दि.30 ः कारखान्याहून परतलेल्या ऊसतोड मजुरांचा हलगीच्या तालावर जल्लोष सुरु होता, यावेळी पाठीमागून गाडीत आलेल्या दारुड्यांनी हार्न वाजवला. त्यांना रस्ता न मिळाल्यामुळे यातील एका दारुड्याने गोळीबार केला. यामध्ये एक ऊसतोड मजूर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ग्रामस्थांनी संतप्त होत गाडीतील दारुड्यांना जबर चोप दिला.
संतोष गायकवाड (रा.केसापुरी कॅम्प) असे गोळीबार करणार्या आरोपीचे नाव आहे. तर सखाराम साहेबराव जाधव या गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. उसतोडीचा हंगाम संपल्यानंतर तालखेड येथे गावी आल्यानंतर सखाराम जाधवसह इतर ऊसतोड मजूर सोमवारी दुपारी जल्लोष करत होते. यावेळी तेथे (एम.एच.42 एच-7084) या स्कार्पिओमध्ये संतोष गायकवाडसह अन्य काही साथीदार होते. संतोष गायकवाड याने गाडीतून खाली उतरत जल्लोष करणार्या दोन ते तीन युवकांना मारहाण केली, त्यामुळे आजुबाजुला असलेल्या ग्रामस्थांनी स्कॉर्पिओला ट्ॅक्टर आडवे लावले. ट्रॅक्टर आडवे लावताच स्कॉर्पिओतील तीन ते चार तरुणांनी धूम ठोकली. यावेळी गायकवाडने त्याकडे असलेल्या पिस्टलने गोळीबार केला. यामध्ये सखाराम जाधव हे जखमी झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गायकवाडचे कपडे फाटेपर्यंत त्यास मारहाण केली. घटनास्थळी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय झोनवाल, पोना.भागवत शेलार आदींनी धाव घेत गायकवाड यास ताब्यात घेतले. तर जाधव यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेने तालखेडसह परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.