गेवराई दि.8 : जागेच्या वादातून सावत्र आईने कुर्हाडीने वार करुन मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील लुखामसला येथे गुरुवारी (दि.8) रात्री घडली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान डोमाळे (रा.लुखामसला ता.गेवराई) यांना दोन पत्नी आहेत. व सात अपत्य आहेत. यापैकी पाडूरंग भगवान डोमाळे (वय-38) यांचा जागेच्या वादातून डोक्यात कुर्हाड घालुन सावत्र आई, तिचा सख्खा मुलगा आणि मुलाच्या मुलाने मिळून हत्या केली आहे. याप्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात रेणुका भगवान डोमाळे (वय-50), वैजिनाथ भगवान डोमाळे (वय-40) व योगेश वैजिनाथ डोमाळे (वय-20) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मारेकरी फरार असून याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे हे करीत आहेत. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.