ASHOK CHVHAN

काँग्रेसमध्ये भुकंप, अशोक चव्हाण 11 आमदारांसह भाजपात जाणार

बीड


मुंबई, दि.12 : काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन राजीनामा दिला. आज पुन्हा एकदा ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार असल्याची माहिती समजते. त्यांनी आपल्या काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला आहे, तशी प्रत आता मीडियावर आलेली आहे. त्यात त्यांनी माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख केला आहे. याशिवाय आ. अशोक चव्हाण हे 11 आमदारांसह भाजपात प्रवेश करत असल्याचे समजत आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर आता ते भाजपमध्ये जातील अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याचंही म्हटलं जात होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याआधी महाराष्ट्रात भूकंपाची शक्यता व्यक्त केली जात होती. आता अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये इतर कोणते नेते राजीनामा देणार याच्या चर्चा होत आहेत.

राहुल नार्वेकर यांची भेट घेण्याआधी महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. अजूनही कुणीही स्पष्ट केलं नाहीय की अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील असं सांगण्यात येतंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौर्‍यावर येतील तेव्हा ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अशोक चव्हाण यांच्या राजीमाम्याची चर्चा असतानाच ते नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. ते मुंबईतच असून आज सकाळी त्यांनी विधानसभा अधक्ष नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर विविध चर्चाना उधाण आले. ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या राजकिय भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे. तर दुसर्‍या बाजूला मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हालचालींना वेग आला आहे. भाजप प्रदेश कार्यलय मध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा , मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पराग अळवणी कार्यालय मध्ये दाखल झाले आहेत.