धुनकवडच्या सुंदर भोसलेला माजलगावकरांनी ‘उत्कृष्ट संवाद’ पुरस्कार जाहीर करून त्यांचा नागरी सत्कार बाप्पांच्या हातानी ठेवला होता. तर त्याच स्टेजवर उजेडदादांचा देखील ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार म्हणून नागरी सत्कार होता. मुषकाला दोन मिनिटे स्टेजवर बोलण्याची संधी मिळाली. मुषक म्हणाले, “असला योग पुन्हा कधीच जुळून यायचा नाय. पण माझी आयोजकांना अजून एक शिफारस हाय की तत्कालीन एस.पी.नंदकुमार ठाकूर यांना कायदा व सुव्यवस्था उत्कृष्टरित्या सांभाळली म्हणून ह्या ठिकाणी सत्कार व्हायला हवा. पुरस्कार विजेते सुंदर भोसले यांचा संवाद आणि त्यावर उजेडदादांचे झालेले भाषण लाखात एक होते” असे म्हणत मुषकाने त्या दोघांचीही स्तुती केली. अन् आंतरवालीच्या मावळ्यांनी आयोजित केलेल्या हितगूज बैठकीकडे दोघेही निघाले. मुषक बाप्पांना घेऊन धरणाच्या कमानीजवळ दाखल झाले. समोर बघतात तर काय नजर थांबणार नाही तितरोक माणसंच माणसं…
बाप्पांनी मुषकाला प्रश्न केला. “आरं हे काय हाय हितगूज बैठक म्हणतोस अन् इतके माणसं कशापायी?” मुषक बोल्ला… “हिथं असंच हाय. घोंगडी बैठक बोल्त्यात अन् लांबरोक दोनचारशे ताडपत्री हाथरून माणसं बसवावी लागत्यात. कधी कधी तर ताडपत्री पण पुरत नाय मग लोकायची पीकं बाजुला करून जागा करावी लाग्ते. तवा कुठं घोंगडी बैठक व्हते. आता आपल्याला हितगूज बैठक करायची म्हणल्यावर मोंढा पुरत नाय. मनुन मग धरणाच्या अंगाला असलेलं भलं मोठं पटांगण फिक्स केलं. आंतरवालीच्या माणसाचा काय विषय अस्ला की लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत्यात. आज ठरवूनच टाकलं व्हतं की धरणात पाणी जास्त हाय का मतदारसंघात आंतरवालीच्या इचाराची माणसं जास्त हायत ह्येचा सोक्षमोक्षच लावूनच टाकायचा”
बाप्पा हितगूज करण्यासाठी बैठकस्थळी दाखल झाल्याची सुचना भोंग्यावरून 10-10 किलोमीटरपर्यंत गेली. ही सुचना आली तवा आजुबाजुच्या रानात कोणी औत हाकीत व्हते. कुणाच्या पाठी फवारा व्हता, कुणी सोयाबीन काढीत व्हते, कोणी धारा काढत व्हते. कुणी भाकरीची वाट बघत व्हते. बाप्पाची पुकार झाल्याबरोबर कुणाला काही सुचेना. लोकांनी सरीतच औतं सोडली, पाठीचा फवारा उतरून बैठकीची दिशा धरली. सोयाबीन काढणी तशीच अडकली. कुणी भाकरी खायचं विसरले. कुणाच्या धारा पिळायच्या राहील्या. जो तो हितगूज बैठकीकडे पळत सुटला. मुंग्याची लाईन लागवी तशी माणसांची लाईन लागली. पोरांची झुंबड उडाली. हा हा म्हणता तीन तालुक्याची माणसं गोळा झाली. उजेडदादांच्या बंगल्यातील माणसं देखील झाडून पुसून बैठकस्थळी आली.
मुषकानं माईक हातात घेतला बोलायला सुरूवात केली. “बैठकीचं नाव जरी हितगूज असलं तरी आपल्याला माजलगावचं हित कशात है हे बघूनच उमेदवार निवडायचा है. ज्येला ज्येला उभा राहायची इच्छा है त्येंनी त्येंनी हात वर करा” मुषकाच्या सुचनेबरोबर उपस्थितांमधून दोन चार हजार जणांचे हात वर झाले. मुषक पुन्हा बोल्ले “आपल्याला गाव तिथून दोन उमेदवार द्यायची नाहीत. अख्ख्या मतदारसंघातून फक्त एकच माणूस द्यायचा है. त्यामुळं ज्येंची खरंच इच्छा, क्वालीटी त्याच माणसानं हात वर करावेत.” पुन्हा एकदा त्या सगळ्यांचेच हात वर झाले. समोरचं दृश्य बघून आता बाप्पांनीच माईक हातात घेतला. बाप्पांनी सभेवर सगळीकडं नजर फिरवली. जे तेलगावात विविध पक्षाकडून उमेदवार्या मागायला आले होते ते हिथं पण दिसत व्हते. बाप्पांनी तेलगावात उमेदवार्या मागणार्यांना पुढं बोलावलं. आणि सांगितलं.
“तुम्हाला आमदार व्हायचंय ना? तर मग तुम्ही तुमच्या पक्षाकडून सेपरेट मेळावे लावा. ज्येच्या मेळाव्याला जास्त गर्दी त्याला त्या पक्षाकडून उमेदवारीची माझी शिफारस” उपस्थित सगळ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. पण हे ऐकताच संभाव्य उमेदवारांचे चेहरे काळवंडून गेले. मुषकाने बाप्पांच्या कानात येऊन सांगितलं. “ह्यांना 10 माणसं जरी गोळा झाली ना तर ह्याच धरणात मी जीव देईन. ह्यातल्या एकाकडं पण ही ताकद नाय उरली. सगळे आंतरवालीच्या जिवावर आमदार व्हायचं म्हणतेत.”
बाप्पानं आता पुढचा प्रश्न केला, निव्वळ आंतरवालीच्या पाठींब्यावर उभं र्हायला कोण कोण तैय्यारयं? आता शंभरेक जणांचे हात वर झाले. बाप्पांनी पुन्हा सवाल केला. “अनाधिकृत वाळू उपसणारे, गुत्तेदार, पक्षाच्या पदावर असलेले, ज्यांचं वय झालंय. ज्याचं शिक्षण निव्वळ कमी हाय, ज्यांच्या नावावर गंभीर गुन्हा हाय अशा लोकांनी आता हात खाली घ्यावेत” बाप्पांच्या या सुचनेनंतर एकही हात वर राहीला नव्हता. बाप्पांनी एकवार सगळ्यांनाच खडसावले, सगळ्या पब्लीकला सांगितले. “हिथून एक असा उमेदवार पाह्यजे ज्येंचा दारूला स्पर्श झालेला नकोय, ज्यांचे अनाधिकृत कुठलेच व्यवसाय नकोत. ज्यो घरून पण टामटूम अस्सल म्हंजे निवडून गेल्यावर म्यानेज व्हणार नाय, ज्याचं पोलीस दफ्तरात मराठा आंदोलनातील गुन्हा सोडता इतर कुठल्या गुन्ह्यात नाव नसावं. ज्येला खरंच मराठा आरक्षणाची कळकळ हाय. ज्येला शेतीमधलं पण कळतं. ज्येला सभागृहात पाठविल्यावर बोल्ता पण येतं. अन् ज्या नावाला निदान मतदारसंघात थोडी फार का व्हायना वोळख असंल, राजकारणातले थोडे फार का व्हईना डावपेच माहित अस्तील असलाच मनुक्क्ष्य आपल्याला निवडावा लागणार है. नाय तर मग आपला मनुक्क्ष्य उभा करू नये. मी म्हणतो त्याच्यावर ह्या पब्लिकचा काय आक्षेप असल तर हिथंच ब्वॉला” असे म्हणत बाप्पांनी माईक मुषकांकडं सोपविला.
मुषक बोलू लागले “बाप्पां काय म्हणतेत त्येच्याशी तुम्ही एकमत हाईत का?” सगळ्या पब्लिकनं पुन्हा एकदा हात वर करून पाठींबा दिला.
सभा संपल्यावर बाप्पा मुषकाला म्हणाले, जातीचा प्रश्न जरा इचित्र झालाय. ज्येला त्येला आपल्याच जातीच्या उमेदवाराला मतदान करायचंय. लोकशाही आता काय राहीली नाय. सगळीकडे जातशाही अवतरलीये. गरीबीच्या पोटाला कसली आली जात? ते तर आजपण गरीबच हायती. आता आरक्षणाची पुनर्रचना तरी व्हायलाच हवी. कितीतरी जाती अजून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातच नाहीत. त्येंना आरक्षण देवून सामाजिक दरी संपवायला हवी. नोकरीत एकदा जातीच्या आरक्षणाचा लाभ घेतला की त्येच्या लेकराला जातीचा लाभ दिला नाय पाह्यजे. जातीबाहेर जाऊन गरीबीचा इच्चार व्हायला हवाय.” बाप्पा चिंतातूर होऊन बोलू लागले. तस तशी गेवराई नजरेस पडू लागली.
- बालाजी मारगुडे, बीड
मो.9404350898
मुषकराज पर्व 5 वे भाग 6