आरोपींवर मकोका लावणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात घोषणा
धनंजय जोगडे । बीड
दि.20 : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन केले. बीडमधील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येणार असून तातडीने बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बीडमधून उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटले. शिवाय हत्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मकोका) नुसार कारवाई होईल. शिवाय या हत्या प्रकरणी आयजींच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून तीन ते सहा महिन्यात या संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाईल, शिवाय एक न्यायालयीन समिती देखील स्थापन केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कोणीही असो सोडणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभागृहात काही सदस्यांनी वाल्मिक कराड यांचे नाव घेतले म्हणून सांगतो, वाल्मिक कराड यांचा एका प्रकरणात सहभाग दिसत आहे. त्यात त्याच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे. दुसर्यात त्यांचा सहभाग आहे की नाही हे तपासले जात आहे. वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल. त्याचे फोटो सर्वांसोबत आहेत. आमच्या सोबत व पवार साहेबांसोबतही आहेत. परंतु या प्रकरणात कोणीही मास्टरमाईंड असला तरी त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली इथंपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील. बीड जिल्ह्यातील लॉसनेस स्थिती पाहायला मिळतेय ती संपवावी लागेल. अवाडा एनर्जी यांनी फार मोठी गुंतवणूक पवनऊर्जा क्षेत्रात केलेली आहे. यातून मोठ्या प्रमाणावर कामं निघत आहेत, काही लोकांना रोजगार मिळतोय. काही काम आम्हालाच द्या नाही तर खंडणी द्या, अशा मानसिकतेत काही लोक वावरत असल्याचं पाहायला मिळतं. याच गुन्ह्यामध्ये 6 डिसेंबरला अवाडा एनर्जीचं ऑफिस आहे तिथं अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे आरोपी तिथे गेले होते. त्यांनी वॉचमनला शिवीगाळ व मारहाण केली.
लायटरने डोळे जाळले यात तथ्य नाही – फडणवीस
मस्साजोग प्रकरणात नेमकं काय झालं याची सविस्तर माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहाला दिली. ते म्हणाले, सिनियर प्रोजेक्ट मॅनेजरला त्यांनी मारहाण केली. मारहाण झाल्यामुळे पीडितांनी सरपंचांना कॉल केला. बाजुच्या गावातील आरोपी मारहाण करत असल्याने सरपंच आले. दादागिरी करत असल्याने सरपंचांच्या लोकांनी चोप दिला, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. 9 डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात होते. ते एकटेच होते. पेट्रोल पंपावर आतेभाऊ भेटले, त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले, स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली.तारांनी गुंडाळून मारहाण केली. गाडीतून उतरवत मारहाण केली. ते मृत झाल्यावर हे सर्व लोक पळाले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सरपंचांचा भाऊ हा सातत्याने विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता. 15 ते 20 मिनिटांत सोडतो असे तो सांगत होता, पण सोडले नाही. प्रचंड मारहाण केली. त्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. सुरेश धस यांनी मुद्दा मांडला, मयत संतोष देशमुख यांचे डोळे जाळले नाही, डोळ्यावर मारहाण केलेली आहे, पण ही निर्घृण हत्या आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यापुर्वी आर राजा यांचीही गेली होती विकेट
बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नावरून यापुर्वी पोलीस अधीक्षक आर. राजा यांची विकेट गेली होती. त्यावेळीही सभागृहात बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला होता. आर.राजा यांच्यानंतर नंदकुमार ठाकूर बीडला एसपी म्हणून आले. त्यांनाही थेट नाही परंतु अशाच प्रकारे मल्टीस्टेट प्रकरणात एका पोलीस निरीक्षकाने घेतलेले लाच प्रकरण भोवले. आता अविनाश बारगळ यांनाही थेट बीडच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून बीडमधून जावे लागत आहे.
आता बीडमध्ये खमक्या अधिकार्याची गरज
बीडमध्ये आता एका खमक्या पोलीस अधिकार्यांची गरज आहे. थेट आयपीएस अधिकारी बीडमध्ये आणला गेला आणि त्यांना मुक्तपणे त्यांचे काम करू दिले तर बीडमधील कायदा अन् सुव्यवस्था तीन महिन्यात रुळावर येईल.