pistal

पिस्तुलासह फोटो अंगलट ; दोघांवर गुन्हा

बीड

परळी / प्रतिनिधी

परळी शहरात परवानाधारक आणि अनधिकृत पिस्तुल बाळगून त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून सामाजिक शांतता भंग करत मा.जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियम आणि अटीची पायमल्ली केल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवाना प्रकरण चांगलेच रंगत आहे.जिल्ह्यात हजारो च्या संख्येने खैरात वाटप केल्याप्रमाणे शस्त्र परवाने वाटप करण्यात आले असून परवानाधारक एवढ्या संख्येने असताना अवैध परवानाधारक शस्त्र किती जणांकडे असतील हा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वतःकडे असलेले शस्त्र याचा गैरवापर करत त्याचे समाज माध्यमावर फोटो व्हायरल केल्या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात या पूर्वी कैलास फड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत समाज माध्यमावर शस्त्र वापर करीत असलेले व्हिडिओ व फोटो प्रसारित केल्या प्रकरणी आता ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दाऊतपूर येथील इसम याच्याकडे असलेले कोणताही अधिकृत परवाना नसताना त्याने विनापरवाना अवैद्य रिव्हॉलवर (अग्निशस्त्र) कब्जात बाळगुन त्याचे फोटो व व्हिडीओ काढुन ते सोशल मिडीयावर प्रसारित केल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं 371/2024 कलम 3/25 भारतीय शस्त्र अधिनीयम 03 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर कन्हेरवाडी ता. परळी वै येथील इसम त्याच्या ताब्यातील अधिकृत परवाना असलेला पिस्टल वापरणे बाबत मा. जिल्हाधिकारी बीड यांनी दिलेल्या अटी व शर्तीचा भंग करुन त्यांचे ताब्यातील पिस्टल दोन्ही हातात धरुन तोंडा समोर हवेत रोखुन स्वतःची व नागरीकांची सुरक्षितता धोक्यात आणुन त्यांचे फोटो काढुन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने सोशल मिडीयावर प्रसारित केले म्हणुन ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं 372/2024 कलम 125.223 भारतीय न्याय संहीता सह कलम 30 भारतीय शस्त्र अधिनीयम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी शहर व तालुक्यात असलेल्या नागरिकांनी आपल्याकडे असलेल्या परवानाधारक शस्त्र असलेला फोटो समाज माध्यमातून प्रसारित केला असेल तर तो तात्काळ हटविण्यात यावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले असले तरी आता अशा पद्धतीने कृत्य करणाऱ्या विरोधात पोलीस प्रशासन कारवाई करत असल्याचे दिसून येत आहे.

Tagged