स्व. गोपीनाथ मुंडे हे संघर्ष, साहस व सेवेचा त्रिवेणी संगम-शिवराजसिंह चौहाण

न्यूज ऑफ द डे परळी बीड

लोकनेत्याच्या स्मृतीदिनी गोपीनाथगडावर जनसागर

परळी : आज आपण गोपीनाथगडावर भाजपचा नेता, केवळ मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून आलो नसून मोठ्या भावाला आणि नेत्याला अभिवादन करण्यासाठी आलो आहे. स्व. गोपीनाथ मुंडे हे संघर्ष, धाडस व सेवेचा त्रिवेणी संगम होते, असे गौरवोद्गार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांनी काढले.

परळीजवळील गोपीनाथ गडावर लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या पुण्यास्मरणानिमित्त शुक्रवारी (दि.3) कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवराजसिंह चौहाण हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार डॉ.प्रीतम मुडे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, खासदार सुजय विखे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. शिवराजसिंह चौहाण म्हणाले, पंकजा मुंडे ह्या मोठ्या नेत्या आहेत. आपण मानता की नाही, हे ठाऊक नाही. त्या मध्यप्रदेश सरकारला मार्गदर्शन करतात. यापूर्वी माझे राजकीय मार्गदर्शक प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे होते. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आहेत. त्यांना मोठे पद मिळाले होते. त्यांच्या सत्कारासाठी लोक उत्सूक होते. असे असताना ते आपल्याला न सांगताच दुसर्‍या जगात गेले. स्व.गोपीनाथ मुंडे यांनी शक्य झाले तर पुन्हा परत यावे, अशी भावनिक साद चौहाण यांनी घातली. ते गरिब परिवारातून पुढे आले होते. त्यामुळे त्यांना गरीबी माहिती होती. गरिबांचे दुःख दूर करण्याची प्रेरणा घेऊनच ते राजकारणात आले. ते संघर्ष, साहस व सेवेचा त्रिवेणी संगम होते. आज महाराष्ट्रातील भाजपचे संघटन हे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेंमुळेच अस्तित्वात आहे. यापूर्वी काँग्रेसला उखडून फेकण्याचे वातावरण मुंडेंच्या संघर्ष यात्रेमुळे तयार झाले होते. तसेच, भाजप शिवसेनेची युती सरकार मुंडेंमुळे निर्माण झाली होती. त्यांनी कायम गोरगरिबांचे कल्याण केले. त्यांचे कल्याण करण्याची ईच्छा असल्यास मार्ग निघतोच, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला. मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाला, तेव्हा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणार नाहीत, ही स्पष्ट भुमिका घेतली. न्यायालयीन लढाई लढली आणि ओबीसी आरक्षण मिळवून दिले. प्रशासन, आयोगाचे सदस्य आपण गावोगाव पाठविले. सर्व्हेक्षण व इतर सर्वच प्रक्रीया पार पाडल्या. चार महिन्यात आयोगाने माझ्याकडे ओबीसी आरक्षणासाठी अनुकूल अहवाल दिला. 75 टक्के ओबीसींना आरक्षण देण्याची शिफारस होती. त्यावेळी मी माझा विदेश दौरा रद्द केला आणि ओबीसी आरक्षण मिळवून देण्याचा निर्धार केला. वकिल, तज्ज्ञ उभे केले. रात्र्-रात्र् जागून आपण मार्गदर्शन केले. न्यायालयातील लढाई जिंकली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणासह निवडणूका लढल्या जात आहेत, असे सांगितले. आज मुंडेंसोबतच्या अनेक आठवणी जाग्या होत आहेत. त्यांच्या तिन्ही मुली त्यांचे नाव कायम उज्वल करीत आहेत आणि करत राहतील असा विश्वास मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकजा मुंडे यांनी केले. तर सूत्रसंचालन ज्ञानदेव काशिद यांनी केले. आभार प्रवीण घुगे यांनी मानले. अमर रहे, अमर रहे; गोपीनाथ मुंडे अमर रहे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी होती.

Tagged