गोपीनाथ मुंडेंच्या दर्शनसाठी गोपीनाथगडावर जनसागर लोटला
परळी : देशभरातील कोणत्याही सरकारला जमले नाही, ते मध्यप्रदेश सरकारने करून दाखविले असे सांगतानाच ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिवराज चौहाण यांचे पंकजा मुंडे यांनी कौतूक केले. शिवराज चौहाण यांच्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारला अनुकरण करण्याची सद्बुद्धी मिळावी आणि ओबीसींच्या आरक्षणाबाबत गुड न्यूज यावी, अशी अपेक्षा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.
परळीजवळील गोपीनाथ गडावर लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या पुण्यास्मरणानिमित्त शुक्रवारी (दि.3) कार्यक्रम पार पडला. यावेळी पंकजा मुंडे ह्या बोलत होत्या. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहाण यांची विशेष उपस्थिती लाभली. पंकजा मुंडे म्हणाल्या, स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी आपण जिथे अंत्यदर्शन घेतले, त्याच ठिकाणी आज आपण पुण्यस्मरणानिमित्त एकवटलो आहोत. आजचा दिवस वाईट असला तरी जनसागर लोटल्याने आनंद आहे. सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी गोपीनाथ मुंडे लढले, त्याचप्रमाणे आपण कार्य करणार असल्याचे त्या म्हणाल्या. काय मिळेल यापेक्षा, आहे ते टिकवून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. वंचितांची सेवा करण्यासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसागर लोटला होता.