होळजवळील अपघात; बळींची संख्या आठ वर

केज क्राईम न्यूज ऑफ द डे

जखमींपैकी चौघांचा रात्रीतून मृत्यू

केज : तालुक्यातील होळ येथे गुरुवारी (दि.०२) सायंकाळी ५ वाजता भरधाव इनोव्हा कारने ॲपे रिक्षाला दिलेल्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला होता तर ९ जण गंभीर जखमी होते. दरम्यान, जखमीपैकी आणखी ४ जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याने या भीषण अपघातातील बळींची संख्या आता ८ झाली आहे.

मुळचे केज येथील रहिवासी मच्छिन्द्रसिंग चरणसिंग गोके (वय ३५) हे दोन वर्षापासून आपल्या कुटुंबासोबत अंबाजोगाई येथे सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ वास्तव्यास होते. तीन दिवसापूर्वी त्यांच्या वडीलांचे केज येथे निधन झाले होते. गुरुवारी केज येथील त्यांचा राख सावडण्याचा कार्यक्रम आटोपून गोके कुटुंबीय आणि नातेवाईक ॲपे रिक्षातून अंबाजोगाईकडे निघाले होते. मार्गात होळच्या विद्युत उपकेंद्रासमोर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा कारने सदरील रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाच्या ठिकऱ्या उडाल्या आणि त्यातील चालक बालाजी संपती मुंडे (वय २८), मच्छिन्द्रसिंग चरणसिंग गोके (वय ४६ ) यांच्यासह प्रियाकौर दिपकसिंग गोके ( वय ०२) आणि वीरसिंग दिपक सिंग गोके (वय ६ महिने) या दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य ९ जण गंभीर जखमी होते. दरम्यान, रात्री उशीरपर्यंत जखमीपैकी दिपकसिंग मच्छिन्द्रसिंग गोके (वय २७), भारतीकौर दिपकसिंग गोके (वय २५), हरजितसिंग बादलसिंग टाक (वय २६, रा. जालना) आणि चंदाकौर बादलसिंग टाक (वय ४५. रा. जालना) या चौघांचा मृत्यू झाला. या अपघातात मच्छिन्द्रसिंग गोके स्वतः, त्यांचा मुलगा, सून, नातवंडे ठार झाल्याने त्यांचे जवळपास संपूर्ण कुटुंबच संपले आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत याप्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Tagged