चंदन तस्करांकडून गावठी कट्टा, पिस्टलसह शस्त्रसाठा केला जप्त!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाई
बीड
दि.6 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज तालुक्यातील होळ परिसरात चंदन तस्करांवर कारवाई केली. यावेळी त्यांच्याकडून चंदनाचा गाभा जप्त केला तसेच एक गावठी कट्टा, एक पिस्टल, जिवंत काडतुसे, कोयते, चाकू, रामपुरी असे शस्त्रही जप्त केले आहेत. या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत मधुकर घुगे (रा.होळ), चंदनशिव मेघराज गायकवाड (रा.तांदूळ ता.लातूर) हे होळ शिवारातील बरड नावाच्या शेतातील चिंचाच्या झाडाखाली चंदन विक्री करण्यासाठी ताशीत बसलेले आढळून आले. त्यांच्याकडून 45 किलो चंदन, दोन दुचाकी, मोबाईल, लोखंडी तराजू असे साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर घुगे यास विश्वासात घेवून चौकशी केली असता होळ ते केज रोडवरील जिनिंगजवळील जीममध्ये काही चंदन ठेवल्याचे सांगितले. पोलीसांनी तिथे जावून पाहणी केली असता जिम मध्ये तयार चंदनाचा गाभा, दोन लोखंडी कोयते, एक रामपुरी चाकू, एक गावठी कट्टा, जिवंत 7 काडतूस, एक गावठी पिस्टल जिवंत 8 काढतुस असा एकूण 2 लाख 84 हजार 400 रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी हनुमंत घुगे, चंदनशिव गायकवाड व चंदन घेणारा आरोपी असे तिघांवर युसूफवडगाव पोलीस ठाण्यात पोह.बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरुन कलम 379, 34 भादंविसह 41, 42, 26 भारतीय वन अधिनियम व भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत त्यांचे पथकातील पोह.बालाजी दराडे, राजीव वंजारे, विकास चोपणे, गोविंद मुंडे, बजरंग इंगोले, मुकुंद ढाकणे, शिनगारे यांनी केली.

Tagged