मुस्लिम बांधवांचे शिष्टमंडळ भेटताच पंकजा मुंडेंनी थेट पंतप्रधानांना लिहिले पत्र

न्यूज ऑफ द डे बीड

Pankaja Munde


बीड : हज यात्रेसाठी जाणार्‍या मराठवाडयातील यात्रेकरूंच्या विमान प्रवासातील तिकिट दरात झालेली तफावत तत्काळ दूर करावी अन्यथा मुस्लिम बांधव ह्या पवित्र यात्रेला जाऊ शकणार नाहीत, यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi आणि केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री स्मृती इराणी यांना पत्र पाठवून यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली.

जिल्हयातील तसेच मराठवाड्यातून मुस्लिम बांधव हज 2023 साठी जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून विमानाने हजसाठी रवाना होणार्‍या बांधवांना यंदा तांत्रिक कारणामुळे 88 हजार रूपये जादा भाडे द्यावे लागत आहे. या संदर्भात काल संध्याकाळी मुस्लिम बांधवांच्या एका शिष्टमंडळाने पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. मी स्वतः जातीने लक्ष घालुन हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा शब्द त्यांनी दिला होता, त्यानुसार त्यांनी मुंबईत पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अल्पसंख्यांक मंत्र्यांना पत्र लिहून यावर त्वरेने कार्यवाही करण्याची विनंती केली. हज यात्रेसाठी मुंबईहून विमानाने जाण्यासाठी 3 लाख 4 हजार 843 रुपये प्रवास भाडे आकारण्यात येत आहे. तर त्याच प्रवासासाठी छत्रपती संभाजीनगर येथून 3 लाख 92 हजार 738 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातून हजला जाणार्‍या मुस्लिम भाविकांना प्रति व्यक्ती 88 हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही खूप मोठी तफावत आहे. हे अतिरिक्त प्रवास भाडे कमी करावे अथवा मुंबई येथुन हजला जाण्यासाठी व्यवस्था करावी यासाठी संदर्भात भाजपाचे अल्पसंख्यांक नेते सलीम जहांगीर यांनी शिष्टमंडळासह पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली होती. सकाळी मुंबईला पोहोचताच पंकजाताईंनी पंतप्रधान आणि स्मृती इराणी यांना पत्र पाठवून हज यात्रेकरूंचा प्रश्न त्यांच्या कानावर घातला आणि यावर 15 मेच्या आत कार्यवाही करण्याची विनंती केली.

Tagged