जिल्ह्यातील भ्रष्टाचार, लोकप्रतिनिधींची टक्केवारी विरोधात जनआंदोलन उभारणार!

न्यूज ऑफ द डे बीड

बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरेंचा इशारा

बीड दि. 10 : मागील तीन वर्षात जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे. पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग यासह सर्व विभागातील अधिकारी बरबटले आहेत. याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. त्यांच्याकडून टक्केवारी घेण्यास सुरू झाली आहे. यामुळे जिल्हयाचा विकास झाला नाही पण लोकप्रतिनिधींची भरभराट झाली. ही टक्केवारी अशीच सुरू राहिल्यास जिल्ह्याची बिकट अवस्था होईल. हे थांबले पाहिजे यासाठी गायरान जमीन, भ्रष्टाचार, लोकप्रतिनिधींची टक्केवारी विरोधात जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी दिला आहे.

बहुजन विकास मोर्चाच्यावतीने बुधवार, 10 मे रोजी बीड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोटभरे बोलत होते. यावेळी प्रशांत ससाणे, जयदीप तांगडे, विनोद शिंदे, श्रीहरी मोरे, मुरलीधर साळवे, नवनाथ धायजे, निलेश थिटे, प्रदीप, बाबासाहेब वाघमारे यांची उपस्थिती होती. यावेळी बाबुराव पोटभरे म्हणाले की, नुकताच उच्च न्यायालयाने गायारान जमिनीवरील अतिक्रमण खाली करावेत असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. राज्यात 50 लाख हेक्टर जमीन ही गायरान जमीन आहे. यामधे देवस्थान आदी जमिनी असून शासनाच्या अधिपत्याखाली आहे. त्यातील 15 लाख हेक्टर वर भूमिहीन, बेघर यांचे अतिक्रमण आहे. 1989 पर्यंत अतिक्रमणे नियमित झाले आहेत. आता नव्याने जीआरमध्ये शासन म्हणात आहेत. घरकुलासाठी अतिक्रमणासाठी जमीन द्यावी. यामधे भूमिहीन बेघर लोकांना नोटीस गेल्या आहेत. 15 लाख हेक्टर जमीन प्रस्थापित लोकांनी ताबा केलेला आहे. त्यात सहकारी कारखाने, सुत गिरणी, संस्था आहेत. ते धनदांडगे लोक आहेत अगोदर त्यांना नोटीस द्यावी. अगोदर त्यांच्या तावडीतून जमीन सोडावी पण एकही प्रस्थापितांना नोटीस आलेली नाही. फक्त घरावर पत्रे असलेल्यांना नोटीस आल्या आहेत. अश्या पद्धतीने शासनाचा दूजाभाव सुरू आहे. कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर अशा पद्धतीचं सूत्र शासनाने राबवले पाहिजे असेही पोटभरे म्हणाले.

लोकप्रतिनिधी मोकाट सुटलेले आहेत
जिल्ह्यात लोकप्रतिनिधी मोकाट सुटलेले आहे. प्रत्येक गोष्टीत टक्केवारी पाहिजे आहे. त्याशिवाय काम होत नाही. टक्केवारी हा विषय जिल्ह्यासाठी अत्यंत वाईट बाब आहे. अधिकारी, लोकप्रतिनिधी फक्त मिळून मिसळून खात आहेत. बोगस बीले उचलले जात आहेत. यावर जिल्हाधिकारी यांच्यासह कुणाचाच अंकुश नाही. टक्केवारी बहाद्दर यांच्याविरोधात जन आंदोलन करू असेही पोटभरे म्हणाले.

Tagged