DRINK SEL

बंदमधील दारु विक्री महागात पडली,19 परवाने केले निलंबित

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका
बीड :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 21 मार्च पासून 25 मे या कालावधीत बंद ठेवण्याबाबत आदेशित केले होते. मात्र बंदचे आदेश असतानाही अनेकांनी चोरीच्या मार्गाने दारु विक्री केली होती. लॉकडाऊन कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाला काही मद्यविक्री अनुज्ञप्त्यांमधून मद्याची अवैधरित्या विक्री होत असल्याच्या प्राप्त तक्रारीनुसार विभागाने सदर अनुद्यप्त्यांचे निरीक्षण केले. यावेळी 19 अनुद्यप्त्यांचे रजिस्टर अद्यावत नसल्याचे तसेच मद्य साठ्यात तफावत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र देशी दारू नियम 1973 व मुंबई विदेशी मद्य नियम 1953 अन्वये विसंगती प्रकरण नोंदविण्यात आले होते. यात दोन देशी दारू विक्री दुकाने, तीन बियर शॉपी व 14 परमीटरूम यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांच्या 16 जून 2020 च्या आदेशान्वये अंबाजोगाई येथील हॉटेल प्रवीण या परमिट रुममध्ये निरीक्षणा दरम्यान मद्य विक्री नोंदवह्या सादर न केल्याने तसेच अंबाजोगाई येथील हॉटेल पवन एक्झिक्यूटिव्ह येथे मद्य साठ्यात तफावत आढळून आल्याने दोन्ही परवाना कक्ष अनुज्ञप्ती पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केल्या आहेत. तसेच परळी येथील पी.व्ही. बिअर शॉपी अनुज्ञप्ती निरीक्षणा वेळी बिअर विक्रीचे रजिस्टर सादर न केल्याचे आढळून आलेल्या विसंगतीमुळे सदर बिअर शॉपी परवाना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केला आहे. लॉकडाऊन कालावधीत ज्या अनुद्यप्त्यामध्ये विसंगती आढळून आल्या होत्या, असे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून संबंधित अनुज्ञप्ती धारकांना जिल्हाधिकारी बीड यांचे समक्ष दिनांक 16 जून व 17 जून रोजी सुनावणीची संधी देण्यात आली आहे. या अनुज्ञप्तीधारकांना 50 हजार रुपये दंड व ठराविक कालावधीकरिता अनुज्ञप्ती निलंबनाचे आदेश निर्गमित करण्यात येत आहे.

Tagged