आम्ही कोणत्याही सैनिकाला ताब्यात घेतले नाही,चीनचा खुलासा

देश विदेश

पीटीआय या वृत्तसंस्थेने चीनने 10 सैनिकांना सोडल्याची बातमी दिली होती

दिल्लीः भारताच्या सैनिकांना आम्ही ताब्यात घेतलं नाही असा खुलासा चीनने केला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी प्रसारमाध्यमाशी आज संवाद साधताना हे स्पष्ट केले. चीनच्या प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

पूर्व लडाखमधील गलवानच्या खोर्‍यामध्ये भारत आणि चीनच्या प्रत्यक्ष ताबारेषेवर मंगळवारी झालेल्या हिंसेदरम्यान चीनने भारतीय लष्करातील 10 जवानांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत होते. मात्र याचबद्दल पत्रकारांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना प्रश्न विचारला असता ही माहिती खोटी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

चीनने दहा भारतीय जवानांची सुटका केल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हवाल्याने शुक्रवारी सकाळी दिलं होतं. दोन मेजर्ससहीत भारतीय लष्कराच्या दहा जवानांची चिनी लष्कराने गुरुवारी संध्याकाळी सुटका केली. तीन दिवस यासंदर्भातील चर्चा सुरु होती अशी माहिती या प्रकणाशी संबंधित अधिकार्‍यांनी दिली आहे, असं पीटीआयने म्हटलं होतं. मात्र आता चीनने वृत्त फेटाळून लावत अशाप्रकारे कोणत्याही भारतीय सैनिकाला चीनने ताब्यात घेतलं नव्हतं असं सांगितलं आहे.

Tagged