प्रतिनिधी। केज
दि.28 ः घरासमोर मुरूम का टाकलास असे म्हणत एका शेतकर्यास लोखंडी गज, काठी आणि दगडाने मारहाण करीत डोके फोडल्याची घटना केज तालुक्यातील मस्साजोग येथे रविवारी घडली. याप्रकरणी चार महिलांसह सहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
भागवत महादेव कदम यांनी घरासमोर मुरूम टाकला असता रविवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास मधुकर कल्याणराव देशमुख, पांडुरंग कल्याणराव देशमुख, ज्योती मधुकर देशमुख, अनिता पांडुरंग देशमुख, ऋतुजा मधुकर देशमुख, राधा पांडुरंग देशमुख हे संगनमत करून कदम यांच्या घरामोर आले. त्यांनी तू घरासमोर मुरूम का टाकलास असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तर मधुकर देशमुख याने हातातील लोखंडी गज भागवत कदम यांच्या डोक्यात मारून डोके फोडले. पांडुरंग देशमुख याने काठीने व दगडाने मारहाण करून त्यांना जखमी केले. त्यांच्या घरातील व्यक्तींना लाथाबुक्याने मारहाण करीत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. भागवत कदम यांच्या फिर्यादीवरून वरील चार महिलांसह सहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत आहेत.
