पालखीचे भोई व्हायचे असेल तर तुम्ही पक्षांतर करू शकता – उध्दव ठाकरे

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र मुंबई राजकारण

सामानाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा पक्षांतर करू पाहणार्‍यांना इशारा

मुंबई, दि.26 : राजस्थानमध्ये सध्या राजकीय संघर्ष सुरु असून महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस केलं तर काय होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करुन बघा असं आव्हान देत मी भाकीत थोडीच करु शकतो असं म्हटलं आहे. पालखीचे भोई होणं एवढंच तुम्हाला समाधान हवं आहे, आणि पालखीचं ओझं वाहायचं असेल तर तुम्ही दुसर्‍या पक्षात जाऊ शकता अशा शब्दांत पक्षांतर करणार्‍यांना सुनावलं आहे. शिवसेना खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बोलत होते. 

     पुढे बोलताना ते म्हणाले, असा कोणाताही विरोधी पक्षातील नेता दाखवा जो दुसर्‍या पक्षात जाऊन सर्वोच्च पदावर गेला आहे, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला आहे. मग तुम्हाला तुमच्या पक्षात असं काय मिळत नाही आहे, ज्यासाठी तुम्ही दुसर्‍या पक्षात जात आहात? अशी फोडाफोडी झाल्यानंतर वापरा आणि फेकून द्या ही निती सर्वांनी वापरल्याची अनेक उदाहरणं आहेत. हे आपल्याकडचं राजकारण आहे. हा एक संदेश आहे की, दुसर्‍या पक्षाने आपला वापर करुन फेकून देऊ द्यायचं की आपण आपल्या पक्षात ठामपणे काम करायचं, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

चीनविषयी नेमकी भुमिका ठरवा
आपल्याकडे काय होतं की पाकिस्तानबरोबर संबंध जरा ताणले गेले की, मग पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध नकोत. त्यांच्यासोबत खेळ नको, क्रीडा नको, हे नको, ते नको. आणि जर ओसरलं वातावरण की, भूमिका बदलते. मग खेळ आणि राजकारण तुम्ही एकत्र आणू नका, कला आणि राजकारण एकत्र आणू नका, ही सगळी बौद्धिकं ऐकवली जातात. पण ताणलं जातं तेव्हा आपली भूमिका ‘खबरदार, जर टाच मारुनी’ अशी असते. मग तो खेळाडू पण नको, कलावंत पण नको, काही उद्योग नको. तसे चीनच्या बाबतीत व्हायला नको. तुम्ही चीनच्या बाबतीत एकदा ठरवा, वस्तू तर सोडाच, पण उद्योगधंदे आपण आणायचे की नाही आणायचे हे. देशाचं धोरण असलं पाहिजे. राष्ट्रभक्ती ही सगळया देशाची सारखी असली पाहिजे. माझी आहे. आपण हे सगळे करार होल्डवर ठेवले आहेत. नको असेल तर परत पाठवू, पण उद्या तुम्ही ‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणून चीनच्या पंतप्रधानांना फिरवणार असाल तर ही संधी आपण घालवायची का? आणि घालवायची असेल तर एकदा दिशा ठरवा, आपण जाऊ पुढे, असेही ठाकरे म्हणाले.

आघाडीमधील कुरबुरी वाढल्या हे खरे नाही
नाही, असं काही नाही. एक गोष्ट स्वीकारली पाहिजे आणि ती मी नक्कीच स्वीकारतो की, गेल्या दोन-तीन महिन्यांत फेस टू फेस गाठीभेटी अवघड झाल्या आहेत. आताच मी वाचलं की, आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. याआधी जितेंद्र असेल, अशोकराव असतील किंवा धनंजय मुंडे हे आजारी पडले होते. सुदैवाने ते बरे झाले आहेत. जितेंद्र तर फारच गंभीर होता. अशा परिस्थितीत या भेटीगाठी थोडयाशा अवघड झाल्या आहेत. त्यामुळे फोनवरून किंवा व्हिडीओच्या माध्यमातून गाठीभेटी थोडयाफार सुरू असतात. आता आपण कॅबिनेट मीटिंगसुद्धा करतो, अर्थात ती थोडी विस्तारली आहे. म्हणजे काही मंत्री त्यांच्या त्यांच्या कार्यालयात किंवा जिथे असतील तिथून मीटिंगला बसतात. मी घरून म्हणजे ‘मातोश्री’वरून सहभागी होतो. मंत्रालयात काही जण भाग घेतात. अशी सगळे जण पसरून ती कॅबिनेट घ्यावी लागते. कारण एकत्र एकाच ठिकाणी बसणं सध्या तरी शक्य नाही. जनतेला आम्ही कायदे सांगायचे आणि आम्हीच ते मोडायचे हे बरोबर नाहीय. त्यामुळे आम्ही ही खबरदारी घेतोय.

मी तुकाराम मुंडेंच्या पाठीशी
tukaram mundhe, udhav thakrey

तुकाराम मुंडे शिस्तीचे कार्यकठोर अधिकारी आहेत आणि मी शिस्तीच्या पाठीशी उभा आहे. पण त्याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल तर वाईट काय? त्या वेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अमलात आणवले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अंमलात आणली तर अशा अधिकार्‍यांच्या पाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे. आततायीपणा कोणीच करू नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हित जोपासलं जात असेल तर चांगलं आहे. शेवटी जनतासुद्धा उघड्या डोळ्यांनी हे बघत असेल. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत हे विसरून चालणार नाही. म्हणून मी मागेसुद्धा म्हटले होते की, हा महाराष्ट्र आहे, त्याचा धृतराष्ट्र अजून झालेला नाही आणि होऊ शकत नाही.
जनतेला अयोग्य वाटले तर प्रकल्प रद्द करेन!
mumbai nagapur
mumbai-nagapur bullet train

राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन, माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या. जेणेकरून विदर्भाच्या मनात कारण नसताना जो दुरावा करून दिला जाण्याचा प्रयत्न केला जातो, तो दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतोय, त्याला आता शिवसेनाप्रमुखांचं नाव दिलं आहे. तसंच मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या. मला आनंद होईल, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात ठाकरे म्हणाले.

आघाडीचं सरकार चालवताना मर्यादा असतात
aghadi sarakar, oparation lotus

आघाडीचं सरकार चालवताना मर्यादा असतात असे मनमोहन सिंग नेहमी म्हणायचे. अटल बिहारी वाजपेयीसुद्धा असेच म्हणत होते. अनेक पक्ष एकत्र असतात, त्यांच्या भूमिका वेगळया असतात. मनमोहन सिंग एकदा त्राग्याने म्हणाले होते, मी काही निर्णय घेऊ शकत नाही, हे आघाडीचं सरकार आहे. मर्यादा असतात. मनमोहन सिंग यांना प्रशासनाचा अनुभव होता. त्यामुळे त्यांना मर्यादेचं भान होतं. मला प्रशासनाचा अनुभव नाही. त्यामुळे मला मर्यादेचं भान नाही, असंही त्यांनी हसून उत्तर दिलं.
Tagged