honey trap

पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने हनी ट्रॅप honey trap

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड जिल्ह्यात खळबळ : मोठ्या असामींना लुटल्याची शक्यता

बीड/नेकनूर, दि.26 : बीडच्या पोलीसांचं नाक आज एका पोलीस कर्मचार्‍याने केलेल्या कुकर्मामुळे चांगलेच कापले गेले आहे. दोन महिला आणि पुरुषांनी एका व्यक्तीला वीट खरेदी करण्याच्या बहाण्याने नेकनूरला बोलावून घेत त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवत आष्टी येथे घेऊन गेले. तिथे त्याची अश्ल्लिल चित्रफित तयार केली. आणि नंतर ती व्हायरल करीत बलात्काराची केस करण्याची धमकी देत 15 लाख रुपये खंडणी मागीतली. या टोळीत चक्क एक पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधीत पोलीस व प्रकरणातील महिलांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणातील एका महिलेवर यापुर्वीही अशाच प्रकारचा एक गुन्हा नोंद आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास गुजर, प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक, सुरेखा शिंदे, सविता वैद्य, अशी आरोपीची नावे आहेत. आरोपीपैकी कैलास गुजर हा पोलीस कर्मचारी असून तो आष्टी ठाण्यात कार्यरत आहे.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, नितीन रघुनाथ बारगजे (रा.टाकळी ता. केज) यांना आष्टी येथील सुरेखा शिंदे या महिलेने भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. विटा खरेदी करायच्या आहेत, असे म्हणत सदरील तरुणास आधी नेकनूरला आणि नंतर मांजरसुंबा येथे बोलावून घेतले. या ठिकाणी त्यांच्यामध्ये विट खरेदी संदर्भात बोलणी देखील झाली. त्यानंतर या महिलेने माझ्या सोबत कोणी नाही, मला पाटोद्यापर्यंत सोडा, अशी विनवणी नितीन बारगजे यांच्याकडे केली. त्यानुसार बारगजे पाटोद्यापर्यंत सोडण्यास गेले. या ठिकाणाहून पुन्हा महिलेने विनवणी केली, मला आता माझ्या आष्टी गावी सोडा, असे म्हटले, त्यानुसार बारगजे यांनी महिलेस आष्टी येथे नेले. तेथील एका घरी गेल्यानंतर महिलेने चहापाण्याचा आग्रह केला.
या ठिकाणी पुर्वीपासून एक महिला होती. सुरेखा हिच्या बोलण्यातून तिचे नाव सविता वैद्य होते. या सविताने काहीतरी खायला घेऊन येते म्हणत सुरेखा आणि बारगजे या दोघांना एका रुममध्ये कोंडून निघून गेली. थोड्याचवेळात त्या ठिकाणी चार ते पाच लोक आले. त्यांनी मला तु कुठला? तू इथे काय करतो? असे म्हणत चापटाने व बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या लोकांनी बारगजे यांच्या अंगावरील कपडे काढून सुरेखा हिच्यासोबत लगट करण्यास भाग पाडले. व याची अश्ल्लिल चित्रफित तयार करून ती व्हायरल करण्याची व बलात्काराचा गुन्हा नोंद करण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची मागणी केली. तिथेच एका कोर्‍या कागदावर बारगजे यांची सही देखील घेतली.

अन् आरोपीच अडकले सापळ्यात
बारगजे यांनी आरोपींना पैसे देण्याचे कबूल केले. त्यासाठी केज येथे ते एका आरोपीसोबत दुचाकीवर आले. येथे आल्यानंतर बारगजे यांनी एका व्यक्तीला निरोप देऊन मला एक व्यक्ती ब्लॅकमेल करीत असून पंधरा लाख रुपये उसने पाहिजेत असे म्हणत निरोप दिला. मात्र पैसे घेऊन येणारा व्यक्ती वेळेत न आल्याने आरोपीला शंका आली. त्यांनी बारगजे यांना दुचाकीवर बसवत चहा पिऊन येऊ म्हणत बीड रोडने निघाले. त्यावेळी बारगजे यांनी गाडीची चावी काढून फेकून दिली. व आरोपीच्या खिशातून मोबाईल काढून घेत त्याला पकडून ठेवले व जवळच असलेला यशवंत ढाबा गाठला. त्या ठिकाणी उसने पैसे मागीतलेल्या व्यक्तीला फोन लावून घडलेली हकीकत सांगितली. थोड्याच वेळात तिथे पोलीस पोहोचले. आणि त्या ठिकाणाहून पुन्हा आरोपीला पैसे मिळाल्याचा निरोप इतर आरोपींना द्यायला लावला. पोलीसांच्या धाकाने आरोपीने पैसे मिळाले आहेत मला घ्यायला या म्हणत दुसर्‍या आरोपींना बोलावून घेतले. त्यावेळी समोरील आरोपींनी प्रशांत ढाब्यासमोर काळ्या कलरची स्कॉर्पिओ (क्र. एमएच 23 बी.डी0075) उभी असल्याचे सांगून त्यातील व्यक्तीचा फोन नंबर दिला. त्यावेळी हा नंबर ट्रु कॉलरवर गुजर पोलीस नावाने दाखवत होता. त्यानंतर पोलीसांनी ही गाडी अडवली. व त्यात ड्रायव्हरसह इतर तीन लोक बसलेले होते. त्यातील एका आरोपीस बारगजे यांनी ओळखले होते. मात्र गाडीत पोलीस आहेत म्हणून पोलीसांनी ही गाडी सोडून दिली.
त्यानंतर केज पोलीसांनी बारगजे आणि शेखर वेदपाठक यांना नेकनूर पोलीसांत आणून आरोपीविरोधात तक्रार नोंद करायला लावली.

केज पोलीसांनी गाडी का सोडली?
बारगजे यांनी स्कॉर्पिओतील आरोपीला ओळखले होते. मात्र तरीही केज पोलीसांनी ही गाडी का सोडून दिली? केज पोलीस कुणाला वाचवत आहेत? यात पोलीस आहेत असे पोलीस म्हणत होते तर बारगजे यांनी गाडीत बसलेल्या एका आरोपीस ओळखले होते. या प्रकरणाचा सविस्तर तपास होणे गरजेचे असून केज पोलीस ठाण्यातीलही काही कर्मचारी यात सहभागी आहेत का याचा शोध घेणे गरजेचे असून पोलीसातच काही टोळ्या कार्यरत असण्याची दाट शक्यता आहे.

तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे
या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख भरतकुमार राऊत यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे प्रकरणात आणखी कोण कोण अडकले? आतापर्यंत यांनी किती जणांना लुटले याची माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Tagged