pistal

वाळू उपशाची तक्रार दिली म्हणून कानाला पिस्तूल लावले

केज न्यूज ऑफ द डे बीड

प्रतिनिधी । केज

दि.11 : तालुक्यातील वाळू माफियांची मुजोरी वाढली असून तक्रार देऊन उपोषणाचा ईशारा दिला सल्याच्या वर्तमानपत्रातून बातम्या प्रसिद्ध होताच वाळूमाफियांच्या ईशार्‍यावरून तक्रार देणार्‍यावर पिस्तुल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका वकीलासह सहाजणांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकारामुळे केज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील बेलगाव येथील प्रताप नरसिंग दातार वय 29 वर्षे असुन त्याचे पुणे येथे सेंट्रींग मटेरियल विकण्याचे दुकान आहे. तो लाँकडाऊन चालु असल्यामुळे बेलगाव येथे गावी आला होता. त्याचे घर हे बेलगाव येथुन जाणार्‍या बोभाटी नदीच्या जवळ आहे. मागील काही दिवसापासुन आरणगाव आणि बेलगावच्या या दोन गावाच्या मधून जाणार्‍या बोभाटी नदीवर रात्रंदिवस लक्ष्मण भोसले वकील रा. वरपगाव, तुळशीराम घुले रा. बेलगाव व राजेभाऊ ईतापे रा.अरणगाव हे संगनमत करुन, जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने वाळू उपसा करीत आहेत. त्या संदर्भात प्रताप दातार यांनी निवेदनाद्वारे वाळू उपसा बंद करून तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यावर कार्यवाही करावी. अन्यथा स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला होता. त्या संदर्भात विविध दैनिकांत बातम्या देखील प्रकाशित झाल्या होत्या. त्यामुळे चिडून वाळू माफियांनी त्यांच्या हस्तकाकरवी दि.9 ऑगस्ट रोजी प्रताप दातार हा मस्साजोग येथून त्याचा मित्र हनुमंत दातार यांच्यासोबत परत बेलगावकडे जात असताना रात्री 8:30 च्या दरम्यान केळगावजवळ तीन अनोळखी इसमांनी त्यांची मोटार सायकल अडवून त्यांना थांबविले. त्यातील एकाने त्याच्या गचुरीला धरून दोघांना मोटारसायकल वरून खाली उतरविले. तर दुसर्‍याने त्याच्या जवळील पिस्तूल कानाला लावून तू आमच्या विरोधात वर्तमानपत्रात बातम्या का देतोस? असे म्हणून अर्वाच्य शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रदीप दातार याने त्यांच्यापासून सुटका करून घेतली आणि ही घटना त्याने मोबाईल वरून त्याचा बीड येथील मित्र नीळकंठ वडमारे यास सांगितली. नंतर प्रदीप दातार याने दि. 10 रोजी सायंकाळी सुमारे 8:00 वा. केज पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन या प्रकरणी तक्रार दिली. त्या नुसार अ‍ॅड. लक्ष्मण भोसले, रा. वरपगाव, तुळशीराम घुले रा. बेलगाव, राजेभाउ इतापे रा. आरणगाव व तीन अनोळखी इसम यांच्या विरोधात गु.र.न. 307 /2020 भा.दं.वि. 341, 504, 506, 34 सह शस्त्रातस्त्र प्रतिबंधक कायद्याचे कलम 3/25 प्रमाणे गुहा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रभारी उपविभागीय पोलीसअधिकारी राहुल धस आणि पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे तपास करीत आहेत.

Tagged