dadasaheb bhagat

आष्टीच्या जिगरबाज तरुणानं पत्र्याच्या शेडमध्ये थाटलं ऑफिस; बनवली स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी

करिअर न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड

प्रतिनिधी । बीड

दि.13 : ज्यांना खरंच काही करून दाखवायचं ते असुविधाच्या तक्रारी करत बसत नाहीत. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशाच प्रकारे आष्टी तालुक्यातील सांगवी पाटणच्या एका तरुणाने महाराष्ट्रातील तरुणांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. अगदी खेडेगावात पत्र्याचं शेड ठोकून तिथेच मित्रांच्या साह्याने एक डु ग्राफिक्स नावाचं स्वॉफ्टवेअर तयार केलं. आता त्या सॉफ्टवेअरचं तो 15 ऑगस्ट रोजी लोकार्पण करीत आहे.
दादासाहेब भगत (वय 28) असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याला अश्विनी गायकवाड, ओंकार पांडे, मनोज करणे, अमीर तांबोळी, अमोल भोसले, कृष्णा झिंझुरके, तुषार खिलारे, सौरभ भगत, इश्वर भगत, रामेश्वर सुंबे, प्रियंका दायडे, प्रतिक्षा गांगुर्डे, अभिजीत सालके, विशाल देवाडिका, विनिता कुश, लक्ष्मण भोसले, अभिषेक जगनाडे, यांनीही मोलाची साथ दिली आहे
दादासाहेब हा मुळचा सांगवी पाटणचा रहीवाशी. येथील सुदर्शन विद्यालयात त्याचं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं. दहावीनंतर त्यानं आयटीआय केला. आयटीआयच्या बळावर त्यानं पुण्यात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यावेळी त्याला पुण्यात इन्फोसिस कंपनीत ऑफिसबॉय म्हणून नोकरी मिळाली. त्याचवेळी पहिल्यांदाच त्यानं ‘सॉफ्टवेअर’ हा शब्द ऐकला होता. इथे ऑफिसबॉयचं काम करीत असतानाच त्यानं अ‍ॅनिमेशन शिकून घेतलं. वेगवेगळी सॉफ्टवेअर कशी बनवतात हे देखील त्यानं जवळून अनुभवलं. त्याचवेळी त्यानं सॉफ्टवेअरमध्ये करिअर करण्याचा मार्ग निवडला. सतत तीन वर्ष तो यावर काम करीत राहीला. मात्र त्याचेवेळी कोरोना नावाचं संकट संपूर्ण जगावर धडकलं. दादासाहेब पुणे सोडून आपल्या मुळ गावी परत आला. इथे आल्यानंतर त्यानं स्वस्थ न बसता इथूनच एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी कॉम्प्यूटरची जमवा जमव केली. शेतातच एक पत्र्याचं शेड उभं केलं. आणि सोबत काही मित्रांना घेत डु ग्राफिक्स नावाचं सॉफ्टवेअर तयार केलं. लॉकडाऊनच्या चार महिन्यात त्यानं रात्रंदिवस हे सॉफ्टवेअर विकसीत करण्यासाठी मेहनत घेतली. आत हे सॉफ्टवेअर पुर्णपणे तयार असून 15 ऑगस्ट रोजी तो त्याचं लोकार्पण करणार आहे.

काय आहे साफ्टवेअर?
बर्‍याच जणांनी फोटोशॉप हे नाव ऐकलेलं असेल. अगदी त्याच प्रमाणे दादासाहेब यानं बनवलेलं डू ग्राफिक्स काम करणार आहे. फक्त हे सॉफ्टवेअर ऑनलाईन असणार आहे. ते कॉम्प्यूटरमध्ये इंन्स्टॉल करण्याची गरज असणार नाही. या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही टॅम्पलेट, रिपोर्ट कार्ड, लग्न, वाढदिवस यांचे कार्ड बनवू शकता. या सॉफ्टवेअरमध्ये व्हिडिओ एडिटींगचा देखील पर्याय उपलब्ध करून देणार असल्याचे दादासाहेब भगत सांगतात.

नाईन्थमोशन नावाची कंपनी स्थापना
दादासाहेब भगत याने आपल्या या कामासाठी नाईन्थमोशन नावाची कंपनी देखील स्थापन केली आहे. सध्या तो या कंपनीच्या माध्यमातून 5945 कंपन्याना ऑनलाईन सेवा पुरवत आहे.

1000 जणांना रोजगार देणार
सध्या माझ्यासोबत 25 जणांची टिम वेगवेगळ्या ठिकाणाहून काम करीत आहे. आपण या कंपनीच्या माध्यमातून येत्या काही महिन्यात 1000 जणांना रोजगार मिळवून देऊ शकू. बंद पडलेल्या उद्योग धंद्यांना स्वतःच्या मार्केटींगसाठी आपलं स्वॉफ्टवेअर मदत करणार आहे, असे दादासाहेब भगत यांनी कार्यारंभशी बोलताना सांगितले.

Tagged