सत्तेत असो किंवा नसो, मी मराठा आरक्षणाच्या कायम बाजूनेच

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : सत्तेत नसताना व असताना देखील मराठा आरक्षण आंदोलनात मी सक्रिय सहभाग घेत कायम आरक्षणाच्या बाजूने राहिलो आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनेच असून मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न केले जातील असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनास भेट देऊन मुंडे यांनी आंदोलकांच्या मागण्या ऐकून निवेदन स्वीकारले. यावेळी आ.संदीप क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी स्वतः सत्तेत नसताना आणि असताना देखील विधिमंडळ सभागृहात व अगदी रस्त्यावर उतरून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या पूर्णपणे पाठीशी असून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी तसेच अन्य न्यायालयीन प्रक्रियेसाठी कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासन यावेळी मुंडेंनी आंदोलकाना दिले. यावेळी मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचे निवेदन धनंजय मुंडे यांना मराठा क्रांती मोर्चा, बीडच्या वतीने देण्यात आले.

Tagged