बीड : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात तोडफोड केल्याची घटना (दि.५) रोजी सायंकाळी घडली होती. याप्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्याविरोधात येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशील पिंगळे (रा.बीड) असे त्या शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते माजलगाव उपविभागाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या दालनात घुसून टेबलवरील काचा, खुर्ची, सीसीटीव्ही कॅमेरा, संगणकाची तोडफोड करुन फेकून दिले. त्यांचे नाव निष्पन्न देखील झाले. पंचायत समितीचे कारकून श्री.कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून सुशील पिंगळे यांच्या विरोधात येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, शासकीय मालमत्तेचे नुकसान, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री.काळे हे करत आहेत.