stethoscope

लढाईच्या वेळेला शस्त्रे खाली का टाकली?

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड संपादकीय

मुद्देसूद

बालाजी मारगुडे, बीड

ज्यानं त्यानं आपली जबाबदारी ओळखून अशा संकटसमयी देशासाठी बलिदानाची तयारी ठेवावी. प्रत्येकवेळी सैनिकच कामी यावा असे आपल्याला का वाटते? सध्याचं युध्द वेगळं आहे. समोर विषाणुरुपी शत्रू आपलं काटेरी आयाळ कुरवाळत आहे. ह्या शत्रुसमोर बलाढ्य देशही हतबल झालेले आहेत. एसएमएस (सोशल डिस्टंन्सिंग, मास्क, सॅनिटायझर) एवढी एकच ढाल नागरिकांच्या हातात आहे. शत्रुला समूळ नष्ट करण्यासाठी विविध देशाच्या शास्त्रज्ञांसह भारताचे शास्त्रज्ञही रात्रं-दिवस संशोधनात व्यस्त आहेत. तोपर्यंत खिंड लढविण्याची जबाबदारी डॉक्टरांवर आहे. मात्र आजची स्थिती पाहीली तर डॉक्टरांकडून घोर निराशा झालेली पहायला मिळत आहे. नाही म्हणायला काही अपवाद आहेत. पण ते पुरेशे नाहीत. सामुहिक ताकदीचं दर्शन यावेळी घडायला हवं. पण तसे होत नाही. असे का? डॉक्टरांना रुग्ण देव मानतोय, देवाच्या जागी सध्या डॉक्टरांची पुजा होतेय. पण हे कुठवर चालणार? देव नवसाला पावला नाही तर लोक त्याकडे पाठ फिरवतात. त्यामुळे हीच वेळ आहे नवसाला पावण्याची. आता तुम्हाला देव व्हायचं की अन्य कोणी? हे ठरविण्याची जबाबदारीच तुमच्यावर आहे.

या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा…

सध्या काय चित्र आहे? खासगी दवाखान्यांनी आपल्या गेटला कुलूप लावून घेतले आहे. ज्यांनी गेट उघडले त्यांचं बील पाहुनच रुग्ण कोमात जात आहेत. आधीच कोरोनानं सगळ्यांची आर्थिक घडी विस्कटून टाकलेली असताना काही डॉक्टरांनी हीच संधी मानून स्वतःची आर्थिक घडी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. अनेकांच्या मेडिकल दुकानात पार्टनरशीप आहेत. गरज नसताना भरमसाठ मेडिकल माथी मारण्याचा उद्योग सुरु आहे. कोरोनावर काम करणारी रेमडेसीव्हर हे इंजेक्शन ओरीजनल 5400 रुपयांत मिळते. मेडिकल चालकांकडून याचा काळाबाजार सुरु असून हे एक इंजेक्शन 18 हजार रुपयांपर्यंत विकले जात आहेत. रुग्णांची नियमित देखभाल, रक्त व लघवी तपासणी, सोनोग्राफी, 2-डी इको, एक्स-रे, ईसीजी, मर्यादित किरकोळ औषधे, डॉक्टर्स तपासणी, रुग्ण बेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, नाकातून नळी टाकणे, लघवीसाठी नळी टाकणे काय दर लावले जात आहेत? दर बघून कोरोनासुध्दा लाजत असेल. मात्र ‘दुखण्याची माय वेडी’ असते. गपगुपान हे सगळं सहन करावं लागत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी हा प्रकार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन केलं. पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही असे दिसत आहे. भरारी पथक दवाखन्यात जाते, रुग्णांच्या नातेवाईकांकडे विचारपूस करते कुठला उपचार सुरुये याची विचारपूस होते. रुग्णांसोबत असलेला नातेवाईक काय उत्तर देणार? त्याला काय समजणार काय उपचार सुरु आहेत ते? बाजुलाच डॉक्टर किंवा त्यांचा कर्मचारी उभा असतो. नातेवाईक डॉक्टरकडे अडकलेले असतात. ते कुठलीही तक्रार करीत नाहीत. मात्र आपण लुटलो गेलो आहोत असे त्याच्या मनात घर झालेले असते. कोरोनाच्या लढाईतील प्रशासनाच्या सर्व विभागाचे मुख्य कोरोना योध्दे सोडले तर खालच्या पातळीवर शुध्द हेतू ठेऊन काम करणारे क्वचित लोक आहेत. आम्हाला मारता काय? अशी त्यांची भावना झालेली आहे. अशा संकटसमयी तुम्ही बलीदान देणार नाहीत तर कोण देणार? देशावर संकट आलंय तर तुम्ही बलीदानाला तयार राहीलंच पाहीजे. नाहीतरी आजपर्यंत तुम्ही, तुमच्या संघटनांनी काय देशाची सेवा केली? रुग्णसेवा म्हणाल तर रुग्ण त्याचं शुल्क अदा करतात. त्यात काय तुमची डोंमल्याची सेवा? स्व. डॉ.शरदकुमार दिक्षीतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. नुसता एक हात आणि मेंदू चालत असतानाही त्यांनी दररोज जगभरात मोफत शस्त्रक्रीया केल्या. बीडमधील डॉ.राऊतमारे हे देखील आठवड्यातून दोन दिवस मोफत सेवा देतात. माजलगावात डॉ.आनंदगाकर हेही त्यातलेच. जिल्ह्यात इतरही ठिकाणी असे अनेक डॉक्टर समाजाचं काही देणं लागतो म्हणून सेवा देत आहेत. इथल्या डॉक्टरांना एखाद्या गरीबावर मोफत उपचार करा म्हटलं तरी त्यांचा जीव कापायला नेल्यासारखा होतो. जिल्हा रुग्णालयातील सरकारी डॉक्टर, नर्स व इतर कर्मचार्‍यांवर मर्यादा आल्या आहेत. तीन महिन्यापासून ते स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटाशी दोन हात करीत आहेत. बीडमधील बालरोग तज्ज्ञांनीही सरकारी रुग्णालयात 15 दिवस सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील इतर डॉक्टरांनी अजुनही आपल्या गेटचं कुलूप उघडलेलं नाही. त्यांनी स्वतःहून कुलूप उघडले तर ठिक अन्यथा इतरांना ती भुमिका वठवावी लागेल. लढाईची वेळ असताना वैद्यकीय सैनिकांनी आपलं शस्त्रं खाली ठेवणं, किंवा आपलं उखळ पांढरं करून घेणं बरोबर नाही. तुम्ही हुशार जमातीमध्ये मोडता, शस्त्रे खाली ठेऊन अतिहुशारी दाखवू नका. युध्दात पाठ दाखवून आलेल्या सैनिकांना पळपुटा म्हणतात. छातीवर गोळी झेलली असेत तर त्याला वीर योध्दा म्हणतात. त्यामुळे चला पटापट पीपीई किट घाला आणि लढाईसाठी तयार व्हा… जिल्ह्यातील रुग्ण तुमची वाट पाहतायत…

Tagged