नुकसाग्रस्त शेतकर्‍यांना तीन महिने करावी लागणार मदतीसाठी प्रतीक्षा

न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र

औरंगाबाद : कोरोनामुळे शासनचा मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च झाला असून राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट झाले अशी कबुली राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. त्यामुळे नुकसाग्रस्त शेतकर्‍यांना आता तीन महिने मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करताना माध्यमांशी संवाद साधला.

कृषी मंत्री दादा भुसे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील नागद, सायगव्हान येथे शेतकर्‍यांच्या शेतात प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, सध्या अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाली याची आकडेवारी नाही. मात्र येत्या आठ दिवसात ही आकडेवारी आमच्याकडे येईल आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकर्‍यांना मदत करण्यासंदर्भात बोलू. सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेता शेतकर्‍यांना तात्काळ मदत करता येईल अशी परिस्थिती नाही. शासनाच्या तिजोरीत सध्या पैसा नाही, ही वस्तुस्थिती आहे, असं भुसे म्हणाले. मात्र शेतकर्‍यांना मदतीसाठी वाटेल ते करु पण शेतकर्‍याला मदत करु, असंही ते म्हणाले. तर, सरकारकडे पैसा नाही, सर्व पैसा कोरोना उपचारांसाठी लावला आहे. पुढील तीन महिने तरी हा पैसा उभा करणं शक्य नाही. पण शेतकर्‍यांना उद्धव ठाकरे वार्‍यावर सोडणार नाही वेळ प्रसंगी कर्ज काढून शेतकर्‍यांना मदत करू, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान, पिके नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करा, असे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे. शेतकर्‍यांना आधी कोरडा दुष्काळ आणि आता ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत असून मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Tagged