corona virus image

माजलगावच्या हायरिस्क 21 जणांचे 9 जूनला स्वॅब घेतले जाणार

माजलगाव

माजलगाव : धारूर तालुक्यातील अंबेवडगाव येथील रुग्णाने माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये 2, 3 व 4 जून रोजी उपचार घेतल्यानंतर हा दवाखाना तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 32 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात 21 जण हायरिस्क तर उर्वरित लो रिस्क म्हणून आहेत. हायरिस्क असलेल्यांचे स्वॅब नियमाप्रमाणे 9 जून रोजी घेण्यात येतील, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली.

देशपांडे हॉस्पिटलमध्ये माजलगाव व बाहेर तालुक्यातून येणार्‍या रुग्णांची नेहमीच गर्दी असते. हृदयाच्या आजार असलेल्यांसाठी हा दवाखाना देवदूताप्रमाणे काम करीत आलेला आहे. ऐन लॉकडाऊनच्या काळात जेव्हा इतर डॉक्टरांनी भितीपोटी रुग्णसेवा बंद केली त्यावेळी देशपांडे हॉस्पिटलमधील सर्व स्टाफने पीपीई किट परिधान करून, कोविड 19 संबंधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जी गाईडलाईन्स दिली त्याप्रमाणे रुग्णसेवा अखंडीत सुरु ठेवली. परंतु रुग्णाने दिलेल्या एका खोट्या माहितीमुळे हॉस्पिटल सध्या बंद ठेवण्याची वेळ आली. 

माजलगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार अंबेवडगावचा हा रुग्ण 2 जून रोजी सकाळी 10 च्या सुमारास देशपांडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला होता. त्यानंतर त्याला 4 जून रोजी सायंकाळी 4 वाजता अंबाजोगाईच्या स्वारातिमध्ये हलविण्यात आले होते. काल त्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर माजलगावच्या आरोग्य विभागाने देशपांडे यांचं हॉस्पीटल तात्पुरतं बंद ठेवलं आहे. शिवाय या रुग्णाच्या संपर्कात आलेला 17 जणांच्या स्टाफला दवाखान्यातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. हा रुग्ण उपचार घेत असताना माजलगाव शहरातील 2 रुग्ण, मंगरूळ येथील 1, कासारी बोडखा (ता.धारूर) येथील 1 असे मिळून 4 रुग्ण उपचार घेत होते. तर आयसीयुत उपचार घेणार्‍या 8 रुग्णांपैकी दोघांना अंबाजोगाईच्या स्वारातिमध्ये हलविण्यात आले आहे. व इतर 6 रुग्णांना डिस्चार्ज देऊन त्यांना व इतर रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होमक्वारंटाईन होण्यास सांगितले आहे, असेही डॉ.परदेशी म्हणाले. 

कोरोना पॉझिटीव्हच्या संपर्कात आलेल्या लोकांची हायरिस्क आणि लो रिस्क अशी कॅटेगिरी करण्यात आलेली आहे. त्यातील हायरिस्कमधील 21 जणांचा स्वॅब 9 जून रोजी घेतला जाणार आहे. आरोग्य विभागाच्या गाईडलाईनुसार रुग्णाच्या संपर्कात आल्यापासून 5 दिवसानंतर संबंधीतांचा स्वॅब घेतल जावा, असेही डॉ.परदेशी म्हणाले.

कंटेनमेंटची शक्यता कमी

सर्वप्रथम हा रुग्ण धारूर तालुक्यातील अंबेवडगावचा असल्याने तेथील लोकांच्या तो संपर्कात आल्याचे गृहीत धरून अंबेवडगाव हे गाव कंटेंनमेंट घोषित केले आहे. माजलगावात हा रुग्ण हॉस्पिटमध्ये पॉझिटीव्ह आढळून आलेला आहे. हॉस्पिटलमध्ये घेत असलेल्या काळजीनुसार तो इथे बाहेरच्या लोकांच्या संपर्कात आलेला नाही. परंतु खबरदारी म्हणून आपण अनेकांना होमक्वारंटाईन होण्याच्या सुचना केलेल्या आहेत. हायरिस्कमधील लोकांचे स्वॅब जर का पॉझिटीव्ह आले तर माजलगाव कंटेनमेंट घोषित करायचे की नाही याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी घेत असतात, असेही डॉ.अनिल परदेशी यांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी माजलगावच्या जनतेला काळजी करण्याची गरज नसली तरी काळजी घेण्याची मात्र गरज आहे.

रुग्णानं लपवली प्रवास हिस्ट्री

रुग्णालयाचे डॉ.श्रेयस देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधीत रुग्ण 2 तारखेला सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी रुग्णालयात आला होता. आल्यानंतर तो ओपीडीच्या कुठल्याही रुग्णाच्या संपर्कात आलेला नाही. नियमाप्रमाणे आम्ही त्याची माहिती कागदावर भरून घेतली. त्याची प्रवास हिस्ट्री विचारली. रुग्णाच्या नातेवाईकांनी आम्ही अंबेवडगावचेच असल्याचे सांगितले. रुग्ण जी माहिती देईल त्यावर विश्वास ठेऊनच आम्हाला काम करावे लागते. सुरुवातीला त्याला चक्कर येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्याला ब्लडप्रेशरचा त्रास सुरु झाला. त्यावर उपचार सुरु केले. नंतर त्याला ताप आला. आम्ही तापेची औषधं दिली.  मात्र आम्हाला संशय आल्याने आम्ही पुन्हा त्यांच्या नातेवाईकांना रुग्णाची प्रवास हिस्ट्री विचारली. पुन्हा त्यांनी आम्ही अंबेवडगाव येथूनच आल्याचे सांगितले. त्या रुग्णाचे ब्लड टेस्ट केल्यानंतर त्यात प्लेटलेट कमी असल्याचे आढळून आले. डेंग्यू सदृश्य आजाराची लक्षणं दिसू लागल्याने त्यावर डेंग्यूचे उपचार सुरु केले. पुन्हा त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले, दोन्ही छातीचा आम्ही एक्स रे काढला असता त्यात निमोनिया असल्याचे दिसून आले. आम्ही पुन्हा रुग्णाच्या नातेवाईकाकडे प्रवास हिस्ट्री विचारली तेव्हा कुठे त्याने आम्ही तुर्भे मुंबई येथून आल्याचे सांगितले. लागलीच याची माहिती आम्ही आरोग्य प्रशासनाला दिली. त्यांनी कोविडची गाडी पाठवून त्यास स्वारातिमध्ये दाखल केले. असे डॉ.देशपांडे म्हणाले.

आम्ही कुठलाही रुग्ण आमच्या दवाखान्यात आला तरी तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समजून सर्वोतोपरी काळजी घेतो. रुग्णांच्या सेवेसाठी आम्ही दिवसरात्रं कार्य करू. परंतु रुग्णांनी आपली खरी माहिती लपवता कामा नये. माजलगावकरांनीही बाहेरच्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असेही डॉ.देशपांडे म्हणाले.

महत्वाची सुचना : संबंधीत बातमीची लिंक फॉरवर्ड केल्यास, फेसबूक व इतर सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केल्यास आम्हाला आनंदच आहे. परंतु ही बातमी आमच्या परवानगीशिवाय जशीच्या-तशी कॉपी करून ती टेक्स्ट स्वरूपात व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर, फेसबूकला पोस्ट करणे किंवा इतर वेबसाईटवर प्रकाशीत करणे, यातून कॉपीराईट कायद्याचा भंग होऊ शकतो. कार्यारंभकडून बातमी वेळोवेळी अपडेट केली जाते. त्याआधीच बातमीचा स्क्रीन शॉट काढून तो व्हायरल करून चुकीचा मेसेज बाहेर गेल्यास त्याची जबाबदारी कार्यारंभ घेत नाही.

Tagged