बीडमधील एसटी चालकाने रत्नागिरीत केली आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

बीड दि.9  : प्रलंबित वेतनासाठी सोमवारी (दि.9) प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत आक्रोश आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन, एसटी कामगार संघटनांनी केले होते. याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. वेतन थकल्यामुळे रत्नागिरीत एसटी कर्मचार्‍याने आत्महत्या केली आहे. हा कर्मचारी बीड जिल्ह्यातील असून या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पांडुरंग गडदे (रा.बीड) असे एसटी चालकाचे नाव आहे. ते रत्नागिरी डोपोत काम करत होते. त्यांचा मृतदेह रत्नागिरी येथील किरायाच्या घरात आढळला आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या चालकाला काम केलेल्या दिवसापर्यंतचा पगार देण्यात आलेला आहे, असा दावा एसटीकडून केला जात आहे. दरम्यान ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेल्या एसटी सेवेतील कर्मचारी दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचे अस्त्र उपसण्याच्या तयारीत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून एसटीच्या कर्मचार्‍यांना वेतन मिळालेले नाही. त्यासाठी राज्यातील एसटी कामगार पुन्हा एकदा आक्रोश करणार आहेत. दिवाळीपर्यंत कर्मचार्‍यांचे थकीत वेतन अदा करावे. तसेच एसटी महामंडळाला तातडीने दोन हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे.

Tagged