jain bhavan beed

जैन दिवाकर शिक्षण प्रसारक मंडळामध्ये गैरप्रकार

बीड

बीड : येथील जैन दिवाकर शिक्षण प्रसारक मंडळात गैरप्रकार घडला असून याबाबत मंडळाचे सचिव मनोजकुमार कोटेचा यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. याशिवाय मंडळाच्या प्रमुख चार पदाधिकार्‍यांना खाजगी वकीलामार्फत नोटीसा बजावण्यात आल्या असून माहिती मागविण्यात आली आहे. या मंडळामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सचिव कोटेचा यांनी केला आहे.
       सचिव मनोजकुमार कोटेचा यांनी ‘कार्यारंभ लाईव्ह’शी बोलताना सांगितल्याप्रमाणे, अध्यक्ष नितीन कोटेचा, कार्यकारी अध्यक्ष प्रकाशचंद कोटेचा, कोषाध्यक्ष मनोज छाजेड, मंडळाचे विश्वस्त अ‍ॅड.रजिलाल भंडारी असे नोटीसा बजावण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांची नावे आहेत. या पदाधिकार्‍यांना अ‍ॅड.विक्रांत पारगावकर यांच्या मार्फत सचिव मनोजकुमार कोटेचा यांनी नोटीसा दिल्या आहेत. नोटीसात म्हटल्याप्रमाणे, पदाधिकार्‍यांनी मागील तीन वर्षाचे आर्थिक हिशोब द्यावा. कार्यालयीन दस्तऐजव घरी नेण्यात आले असून ते परत करण्यात आलेले नाहीत, ते तातडीने परत करावेत. वेळोवेळी सांगूनही नवीन निवडी करण्यात आलेल्या नाहीत, त्या निवडी व्हाव्यात. याबाबत जिल्हा प्रशासनासह सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. तसेच पदाधिकार्‍यांनी गैरव्यवहार लपविण्यासाठी माहिती व दस्तऐवज देण्यास टाळाटाळ केलेली असल्याने वकीलामार्फत नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. पदाधिकार्‍यांनी कायदेशीररित्या सहकार्य न केल्यास त्यांच्याविरोधात कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सचिव मनोजकुमार कोटेचा यांनी सांगितले.

भ्रष्टाचार केला नाही तर हिशोब देण्याची भिती का?
जैन दिवाकर शिक्षण प्रसारक मंडळा अंतर्गत जैन भवनाचे काम सुरु आहे. त्या मंडळाचे पदाधिकारी गेल्या पाच ते सहा वर्षापासून हिशोब देत नाहीत. त्यांनी जर यात भ्रष्टाचार केला नसेल तर त्यांना दस्तऐवज व हिशोब देण्यास भिती काय वाटते असा सवाल अरिहंत नेहरु युवा संघटनेचे ललित आब्बड यांनी उपस्थित केला आहे.

मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, अधिकारी नॉट रिचेबल
मंडळाचे प्रमुख पदाधिकारी व विभागाचे अधिकारी यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल होते. त्यामुळे त्यांचे म्हणणे समजू शकलेले नाही.

Tagged