नेकनूर दि.15 : दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणार्या तरुणीवर अॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट (ता. बीड) येथे घडली होती. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी आरोपी अविनाश राजुरेला देगलूर पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
अविनाश रामकिसन राजुरे (वय 25 रा.शेळगाव ता.देगलुर जि.नांदेड) असे आरोपीचे नाव आहे. बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी रस्त्यालगत 22 वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. शेळगाव (ता.देगलूर जि. नांदेड) येथील तरुणी गावातीलच अविनाश सोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दि.13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे 3 वाजेच्या सुमारास येळंबघाट (ता.बीड) परिसरात अविनाशने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर अॅसिड टाकले. त्यांनतर काही वेळाने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले अन् अविनाश घटनास्थळावरून फरार झाला. अॅसिड हल्ला आणि पेट्रोलने तरुणीचे 48 टक्के टक्के शरीर भाजले होते. पहाटे 3 वाजता घटना घडलेली असतांनाही अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी रस्त्या लगत तब्बल 12 तास पडून होती. दुपारी 2 वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्यात पहिले व याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचा जबाबवरुन नेकनूर पोलीस ठाण्यात 307, 326 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि.लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.जाधव करत होते. तरुणीचा उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला. त्यानंतर नमुद गुन्ह्यात वाढ करत कलम 302 ची वाढ करण्यात आली. रविवारी सायंकाळच्या सुमारास देगलुर पोलीसांनी अविनाश राजुरे यास अटक केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
