MANOJ JARANGE

जरांगे पाटील आक्रमक; सागर बंगल्याकडे रवाना!

बीड

बीड दि. 25 : अंतरवाली सराटी येथे आज रविवारी (दि.25) दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांची बैठक बोलावली होती. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला जीवे मारण्याच्या धमकी येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझा बळी पाहिजे असेल तर मी सागर बंगल्यावर येतो, उपोषण करून मरण्यापेक्षा सागर बंगल्यावर येतो, तिथे माझा बळी घ्या… असं म्हणत आक्रमक भूमिका घेत सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी मराठा आंदोलकांकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जात असून मनोज जरांगे पाटील आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटलांच्या या निर्णयामुळे मराठा बांधव आक्रमक झाला आहे. देवेंद्र फडणीस यांचा बामणी कावा माझ्या बाबत चालू देणार नाही, सागर बंगल्यावर पायी उपोषणासाठी चालत येणार आहे, माझा बळी घ्यायचा आहे तर तिकडे घ्या असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, ते बोलताना पुढे म्हणाले की, सत्तेच्या जोरावर काहीही करत आहेत. शांततेत रास्तारोको केल्यानंतरही रात्रीतून सर्व पोलीस अधिक्षक, पीआय यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यांनी कुणाकुणाला हाताखाली धरले आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मराठ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, खोटे आरोप करू नका, माझा बळी पाहिजे असेल तर मी सागर बंगल्यावर येतो तिथे माझा बळी घ्या… असे म्हणत जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. यामुळे अंतरवाली सराटीत मराठा बांधव आक्रमक झाले आहेत.

Tagged