corona

बीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह

बीड

बीड : काल प्रलंबीत असलेल्या 27 रिपोर्टपैकी 2 पॉझिटीव्ह आले असून उर्वरित सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आलेले बीड शहरातील आहेत. इकडे माजलगावातील स्वॅबही पाठविण्यात आलेले होते. ते सर्व निगेटीव्ह आल्याने माजलगाववासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काल माजलगावातून 58, बीडमधून 57, अंबाजोगाई 2, उपजिल्हा रुग्णालय केज 1, ग्रामीण रुग्णालय आष्टी 7, उपजिल्हा रुग्णालय परळी येथून 5 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले होते. जिल्हाभरातून एकाचवेळी 130 स्वॅब पाठविण्याची ही पहिलीच वेळ असल्याने जिल्हावासियांच्या नजरा या रिपोर्टकडे लागलेल्या होत्या. काल 103 अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 100 निगेटीव्ह तर बीड शहरातील मसरत नगरचे 3 पॉझिटीव्ह आढळले होते. काल 27 प्रलंबीत रिपोर्टपैकी आज 2 पॉझिटीव्ह आले. हे देखील बीड शहरातील मसरत नगरमधीलच आहेत.

मसरतनगरमधील प्रतिष्ठीत कुटुंबातील तीन सदस्य हैद्राबादला गेले होते. त्यांच्यासोबत झमझम कॉलनी येथील चालक गेला होता. चालक परत आल्यानंतर त्याला त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा स्वॅब तपासणीत पॉझिटीव्ह आढळून आला. प्रशासनाने तत्काळ त्यांच्यासोबतच्या तिघांना क्वारंटाईन केले. मात्र हे तिघे क्वारंटाईन असताना नातेवाईकांच्या लग्नाला गेले. आता याच कुटुंबातील एकूण 5 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.
देशपांडे हॉस्पिटलमधील स्टाफला दिलासा
माजलगाव शहरातील प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ.देशपांडे यांच्या हॉस्पिटलमध्ये आंबेवडगावच्या एका रुग्णाने उपचार घेतले होते. त्यानंतर तपासणीत हा रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आला. त्यानंतर त्याच्या दोन सुना व एक नातूही पॉझिटीव्ह आढळून आला. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने देशपांडे हॉस्पिटमध्ये या काळात संपर्क आलेल्या 58 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. सुदैवाने हे सर्व निगेटीव्ह आढळून आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल परदेशी यांनी दिली. त्यामुळे माजलगावकरांवरील मोठं संकट टळलं आहे.

बीडमध्ये आता आजच्या सहीत 18 अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 2 औरंगाबाद, व एक पुणे येथे उपचार घेत आहेत. आतापर्यंत 81 जणांची नोंद कोरोना पॉझिटीव्ह आहे. त्यातील 2 मयत आणि 61 जणांना डिस्चार्ज झालेला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

Tagged