बीडमधून पेटली क्रांतीची मशाल; आज जिल्हा कचेरीवर धडकणार मराठा मोर्चा

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

जिल्ह्यासह परजिल्ह्यातील मराठा समाजबांधवांचा मोर्चात सहभाग

बीड : मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मराठ्यांनी पुन्हा एकदा बीडमधून क्रांतीची मशाल पेटविली आहे. आरक्षणासाठीचा लढा पुन्हा पहिल्यापासून सुरु झालेला आहे. आता थोड्याच वेळात मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हा कचेरीवर धडकणार आहे. या मोर्चात जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही मराठा समाजबांधव सहभागी होत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर सरकारवर दबाव तयार करून पुन्हा एकदा आरक्षण मिळविण्यासाठी मोर्चा काढण्याची घोषणा आमदार विनायकराव मेटे यांनी सर्वप्रथम केली. त्यानंतर त्यांनी एक तारीख बदलली होती. परंतू लॉकडाऊन वाढल्यानंतर लॉकडाऊन असो किंवा नसो, मोर्चा निघणारच अशी ठाम भुमिका मांडली. आमदार मेटे यांना साथ देत कै.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील हे देखील मोर्चात सहभागी झाले. मेटे, पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व समन्वयकांच्या पुढाकारातून जिल्हाभरात ठिकठिकाणी बैठका घेऊन मोर्चाला येण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी दिर्घकालीन लढा होणार नसून मराठ्यांनी एकजूट दाखवली तर सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या गाईडलाईन्सनुसार लवकरात लवकर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडू. त्यामुळे मराठा समाज बांधवांनी कुठल्याही अफवा, पोलीसांच्या भितीला बळी न पडता सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज सर्वच मराठ्यांनी आपआपले राजकीय जोडे बाजुला ठेऊन होत असलेल्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चात सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यासह परजिल्ह्यातून मोर्चात सहभागी होणार्‍या मराठा समाजबांधवांचीही संख्या मोठी आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
आजच्या मोर्चास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी नाही. त्यामुळे मोर्चाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तरीही मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होतील, हा अंदाज बांधून जिल्हा पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला आहे. 700 ते 800 अधिकारी, कर्मचार्‍यांचा बीड शहरात बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

मास्क, सॅनिटायजरचे वाटप
मोर्चात सहभागी होणार्‍या प्रत्येकास मास्क, सॅनिटायरचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे मोर्चेकर्‍यांनी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सीए बी.बी.जाधव, अ‍ॅड.मंगेश पोकळे यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना केले आहे. दरम्यान, पोलिसांकडून सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

असा आहे मोर्चाचा मार्ग
या मोर्चाची सुरुवात झाली. हा मोर्चा श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल – शहर पोलीस स्टेशन – आण्णाभाऊ साठे चौक – छ.शिवाजी महाराज पुतळा – जिल्हाधिकारी कार्यालयावर धकडणार आहे. नियोजनाप्रमाणे मोर्चाचा क्रम हा सर्वप्रथम महिला व मुली त्यानंतर योग्य अंतर ठेऊन विद्यार्थी व पुरुष असा आहे. याप्रमाणे मोर्चात शिस्तीत चालण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. कोणीही समाज बांधवांनी पुढे जाण्यासाठी घाई करु नये. शिस्तीचे पालन करावे व मोर्चासाठीची आदर्श आचार संहिता तयार करण्यात आली आहे, ती तंतोतंत पाळावी. पार्कींगची व्यवस्था दुचाकी वाहनांसाठी सिध्दीविनायक कॉम्प्लॅक्सच्या पाठीमागे करण्यात आली आहे. तसेच चारचाकी वाहनांसाठी जालना रोडच्या दोन्ही ही बाजूने करण्यात आली आहे.

Tagged