balasaheb bothe

नगरच्या पत्रकाराने दिली सुपारी; रेखा जरे हत्या प्रकरणात नवा खुलासा

क्राईम राजकारण

नगर : येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी रेखा जरे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झालेला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी मुख्य आरोपीचे नाव घेतल्यानंतर हे नाव ऐकून महाराष्ट्र चक्रावून गेला आहे. येथील दैनिक सकाळचे निवासी संपादक बाळासाहेब बोठे यांनी ही सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. बोठे याचं नगरच्या पत्रकारिता क्षेत्रात मोठं नाव आहे.
रेखा जरे यांची हत्या करताना एका आरोपीच्या मदतीने सुपारी देऊन बोठे यांनीच ही हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. बोठे फरारी असून अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. घराची झडती घेतली असून, काही वस्तू जप्त करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. रेखा जरे हत्या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी तीन आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडे चौकशी केली असता, सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार यांची नावे समोर आली. या दोघांनाही पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. या पाच जणांकडे चौकशी केल्यानंतर पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. तसे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी तातडीने बोठे यांना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत. रेखा जरे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली आहे, हे मुख्य सूत्रधाराला पकडल्यानंतरच स्पष्ट होईल, असेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून सुपारीची रक्कम 6 लाख 20 हजार रूपये जप्त केली आहे. ही सुपारीची रक्कम बोठे व भिंगारदिवे यांनी मिळून दिली होती, असेही पाटील यांनी सांगितले. आज न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये या सर्व आरोपींची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

हनी ट्रॅपबाबत धक्कादायक बातम्या
बाळासाहेब बोठे यांनी काही महिन्यापुर्वी नगरमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकट संदर्भातील मालिका दैनिक सकाळ आणि सरकारनामा या पोर्टलला चालवली होती. ही मालिका राज्यभर गाजली. त्यांच्या कामाची दखल घेऊन दैनिक सकाळने त्यांना नगर आवृत्तीच्या कार्यकारी संपादक पदावर बढती देखील दिली होती, असे समजते.

Tagged