mushakraj

मुषकराज 2022 भाग 6 मु.पो. लिंबागणेश…

न्यूज ऑफ द डे मनोरंजन महाराष्ट्र राजकारण

तांबडं फुटायला मुषकराज बॅगा भरून तयार झाले होते. आज बीडहून गाडी थेट आष्टीला धावणार होती. बाप्पानं एक स्टिकर मुषकाच्या हाती दिलं अन ते गाडीला लग्नाचं स्टिकर लावतात त्या पध्दतीने पाठीमागून लावायला सांगितलं. त्या स्टिकरवर लिहीलं व्हतं ‘सहज नाही मुद्दामहून’ दौर्‍याचा रूट ठरला. केज-मांजरसुंभा-पाटोदा मार्गे गाडी आष्टीला पोहोचणार होती. बाप्पांनी आजचा दौरा एकदा नजरेखालून घातला. त्यात त्यांनी लिंबागणेशला नाष्टापणी करून मग पुढं धकायचंय… अशी दुरस्ती सुचवली. ‘जी हूकूम म्हणत’ मुषकाने त्यांचा आदेश मानला. पण मुषकाला कैच कळंना की हिथं कशासाठी? अलिकडं चांगलं मस्साजोगला पोह्ये खाऊन मग पुढं धकायचं अशी मुषकाच्या मनात योजना होती. आता मस्साजोगचे पोह्ये खायला मिळणार नैत आज आपली उपासमारच व्हणार म्हणून मुषक आतून नाराज झाला व्हता. पण चेहर्‍यावर त्यानं तसे कुठलेही हावभाव दाखवले नाहीत. गाडी लिंबागणेशला पोहोचताच बाप्पांचं लिंबागणेशच्या भाच्च्याने (सोपनीलभैय्या) तोफेच्या सलामीनं धुमधडाक्यात स्वागत केलं. आवाज होऊन रिकाम्या झालेल्या एक एक नळ्या दहा किमी अंतरावरील मस्क्यांच्या पालवनला जाऊन पडत व्हत्या. तेव्हढ्यात लगबगीनं एक डॉक्टर बाप्पांच्या पुढ्यात आले. त्यांनी बाप्पांच्या हाती ‘शेतकरी विरोधी कायदे’ हे पुस्तक देऊन फोटोपोजमध्ये उभे र्‍हायले… पुस्तक देणार्‍यास मुषकाने कुठे तरी बघीतल्यावानी वाटत होते. मुषकाने खिशातला मोबाईल काढत फेसबूक स्क्रोल केले तर लागलीच एक फुटू समोर आला. एका हातात भलं मोठं पातेलं त्यात बटाट्याऐवढाले गुलाबजामून अन् पळीने (भाजी हलवायच्या चमचा) एक एक गुलाबजामुन पोटात ढकलणार्‍या ह्या माणसाची मुषकाला ओळख पटली. मुषकानं पुन्हा स्क्रोल केलं. प्रचंड बातम्यांची कात्रणं, स्क्रीन शॉट, शिवाय लांबलचक तळलेले मिरची भजे, मुटके, चकुल्या, पॅटीस, धपाटे, बाजरीचे भाजलेले शेंगुळे, डाळींबं, चिक्कू, जांभळं, टरबूज, लाल बोरं, हापूसची पेटी, भाजलेल्या शेंगा, ज्ञानयोग थाळी, आईस्क्रीम काय काय नाय बघीतलं… आधी तर वाटलं हे झोमॅटोच्या सीओचं अकौंट है का काय? पण तसं नव्हतं. हे आपल्या ढव्ळेबापुचं आकौंट व्हतं. आता मुषकाच्या तोंडाला पाणी सुटलं… तसं ढव्ळेेबापुंनी बाप्पांना त्यांच्या घरी पधारण्याची विनंती केली. आता मुषक जाम खुष झाला. पण बाप्पा म्हणाले ‘अजून आष्टी पौचायचंय’ तवा ढव्ळे बापु म्हण्ले ‘आष्टी जाऊन कशाला उगी रान हाकता. ह्या इथंच भ्रष्टाचार्‍यांचे कर्दनकाळ अजित देशमुख, राम्खाडे, शनि महाराज उर्फ रामनाथ खोड, शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं म्हण्णारे मनोज जाधव, झोपडपट्टी दादा म्हणून खोट्या गुन्ह्यात हर्सुल मुक्कामी राहीलेले शिवराज बांगर, काही पत्रकार अन् इतर सामाजिक कार्यकर्त्यांन्ला तुम्हाला भेटून काही सांगायचंय… थोड्याच येळात धसकटराव, जीमराव दगडधोंडे उर्फ पैलवान, मैबुबभाय, गजबे काका, सग्ळेच पौचतील. तवर आपुन आपल्या घरी बसू… बाप्पांचा प्रवास अन् वेळ वाचणार असल्याने मुषकही जाम खुष झाले. त्याहीपेक्षा ढव्ळेबापुंच्या घरी जायचं म्हणून मुषकाचा आनंद गगनात मावत नव्हता. दारातच दवाखान्याचा बोर्ड मुषकानं न्याहाळला. थोडं पुढे सरकलं तर तिथे एका भिंतीवर लिहीले होते ‘आंदोलन हा माझा जन्मसिध्द हक्क आहे अन् ते दर सोमवारी केल्याशिवाय मी शांत बसणार नै’ मुषक आता पुरता बावचळून गेला… जिन्याच्या पायर्‍या चढून जसे पहिल्या मजल्यावर पोहोचले तिथं समोरच्या भिंतीवरच तिसरं स्लोगन होतं. त्यावर लिहीलं होतं. ‘इथं तयार केले जाणारे सगळे पदार्थ ताजे अन् फ्रेश असतात, पण खायचे झाल्यास ते आपआपल्या घरी बनवून खावेत. तरच ते पचतात’ तर खालच्या कोपराला बारीक अक्षरात टाकलं व्हतं. ‘सहज नै मुद्दामहून…’ आता काय करावं हे मुषकाला समजेचना… मुषकानं किचनमध्ये डोकावून पाह्यलं. किचनच्या चारही भिंतीवर विविध पदार्थ कसे बनवायचे याच्या रेसिपी लिहून त्या एका कागदावर चिटकवलेल्या होत्या. त्याखाली डॉक्टर वैनीसायबांची सही अन् इंग्रजीत तिसर्‍या लिपीत लिहीलेली एक तळटीप व्हती. त्याचा मराठी अनुवाद होता… ‘पदार्थ बनवून झाल्यावर भांडे स्वच्छ घासून-पुसून ठेव्ली जावीत…’ पोटात कावळे ओरडायलेत अन् आता जर का हे बनवून खायचं अन् पुन्हा भांडेबिंडे घासायचे म्हंजी… मुषक जाम वैतागला… न राहवून त्याने ढव्ळे बापुंना विचारलेच ‘बाप्पाच्या नाष्ट्यापाण्याची सोय काय हैय?’

ढव्ळेबापु : मुषका बाप्पांची सोय झाली हैय, पण तुला लैच भूक लागली असेन तर कुठलीपण एक रेसिपी वाचीव अन् ज्ये पाह्यजे ते बनवून खाय. हिथं असंच हैय ‘कमवा अन् शिका’च्या धर्तीवर ‘बनवा अन् खा’ मुषकाला आता हसावं का रडावं हेच समजंना… त्यानं गपगुमान बाप्पाच्या पुढ्यात येत बाप्पांसमोर जेव्हढं म्हणून ठेवलं ते सगळं फस्त केलं. इकडे तोपर्यंत एक एक मान्यवर ढव्ळे बापुच्या घरी दाखल होऊ लागले. सगळ्यात आधी आले ते अजित देशमुख त्यांनी बाप्पांचं दर्शन घेत त्याचा व्हिडिओ काढून छोटसं रिल बनवून फेसबूकला अपलोड केलं. आता राम्खाडे आले त्यांनी बाप्पांना चरणस्पर्श करून बाप्पांच्या पुढ्यात आपली जागा फिक्स केली. आता हातात हलगी वाजवत वाजवत त्यावर ठेका धरत धसकटरावांची एन्ट्री झाली. त्यांनी बाप्पांना चरणस्पर्श करून राम्खाडेला चिटकून जागा धरली. आता मैबुब आणि गजबे काका एकाच गाडीतून दाखल झाले. मिटींग सुरु झाली तरी आष्टीचा पैलवान कुणाच्या नजरी पडत नव्हता. बाप्पा मुषकाकडे पहात पैलवान कुठवर आलेत बघा जरा, असे खुणावले. मुषकानं गच्चीवर जाऊन आदमास घेण्याचा प्रयत्न केला. तर एक गडी आपल्या गाडीच्या मागंमागं पळताना दिसत होता. मुषकाने पैलवान येत असल्याची हाकाटी दिली. पैलवान पळत येत असल्याने काहीजण आश्चर्यचकीत झाले. पण धस्कटरावांना हा प्रकार नवा नव्हता.

धस्कटराव : ह्येन्ला कितीदाबी सांगा… जित्याची खोड मेल्याबिगर जात नाय तशी ह्यांची गत… मागं अंबाजोगाईत गडकरीच्या सभेला पण हे असेच गाडीमागं पळत पळत सभास्थळी धापा टाकत उशीरा पौच्ले… एकदा तर पिच्चरला गेले म्हणून मंत्रिपद हुकलं… कवा काय करावं ह्याचं गिन्यान नसल्याने 2019 ला आप्टी खाल्ली. तरीबी ह्यो बाबा सुधरत नै.

जीमराव दगडधोंडे : येळाला पौच्लू नसतु तर देवाधर्माच्या जमीनी मला मिळाल्या तरी अस्त्या का? त्या पण तुमच्या तावडीतल्या… मला सांगा, रजिस्ट्रीच्या कामाची कुठली येळ चुकवीली? तैसीलदार, मंडळाधिकारी नाय आले तर त्येंना त्येंन्च्या घरी जाऊन आण्ले. तसे येत नव्हते तर आधी ‘निवद’ दाखविला… तुमच्यावाणी सगळं फुकट नै बगत आमी… एकदा नै तर चारदा आमदार झालुयं. तेबी जंन्तेतून… मागच्या दारानं नै तुमच्यासारखं… आरं करायचाच असंल वार तर असा पुढून करा छाताडावर… कट्टप्पाच्या अवलादीसारखा पाठीत वार करणार्‍यातले आम्ही नैत…

धस्कटराव : कट्टप्पा कुणाला म्हण्तु रंऽऽऽ ऐन मतदानादिशी झोपून राहणारा माणूस ‘भाहुबली व्हयचं सप्नं पाहतंय… तरी परळीच्या तैईला म्हण्लं व्हतं. मह्या घरात तिकिट द्या. मप्लं पोरगं मिशी फुटायच्या आधी आमदार केलं अस्तं. पण झालं ना आता ‘तुला न मला घाल गजबेला’ वय झालंय तर आता घरात बसावं. नातूला खेळवावं… पण नै कुठबी त्वांड वर करून पळत निघणार… बरं पळून काय दिवे लावले? मी म्हण्तु पळतच यायचं तर त्या गाडीचं डिझेल तरी कशापायी जाळतू मग…

जीमराव दगडधोंडे : बगा बगा बाप्पा कसे बोल्तेत… ‘तुला न मला घाल ड्वॉग’ला म्हणायचं व्हंतं ह्यांना… तुमच्या हातानं समज द्या ह्यांना… एकदा नैय अनेकदा हे असंच झालंय… मला ईचारतुय पळून पळून काय दिवे लाव्ले? अविनाश साबळेनं उगच ऑलम्पिकमधून कांस्य आणलं नाय… प्रेरणा घेणं म्हण्त्यात ह्याला… तुमच्याकडून काय कुणी प्रेरणा घ्या… (मैबूबकडं बघून) व्हयं मैबूब?

गजबेकाका : ह्या दोघांचं कव्हरूक बी चलन… जरा आमालाबी बाप्पापुढं गार्‍हाणं मांडायची इजाजत द्या…

मुषक : (लोकसभेचा अध्यक्ष असल्याच्या थाटात) धस्कटआण्णा और दगडधोंडे साब आप निचे बैठीये… अब इनको बोलणे का मौका दिजीए… आप दोने के जमीन घोटाळेकी जाँच चल रही है… जरा सोच के बोलीये… चलो बोलीये गजबेजी…

गजबेकाका : अध्यक्ष महोदय… कुणाच्या भांडणात आमचा कसा लाभ झालाय हे मी आता इथं सांगणार नै… पण चक्क देवांच्या जमीनी ढापल्या जाव्यात हे काय मला पटत नाय… ह्या सगळ्या फाईल आता मी मुषकाकडे सुपूर्द करतोय… ह्यांची वरीष्ठ एजन्सीकडून जांच-पडताळ व्हायला हवी. हा काय साधा सुधा मामला नाय… देव हैत का नाय असा सवाल ह्यामुळं निर्माण झालाय…

बाप्पा : जिल्याच्या कलेक्टरांना सांगावा धाडा, झेडपीच्या सीईओ सायेबांना पण ताबडतोब निरोप द्या, सगळं शिक्षण खातं सोबत आणा म्हणावं. कलेक्टरांना पण सांगा सगळं अधिकारी तुमच्या बरूबर पाह्यजेत… तोपर्यंत आम्ही थोडी रेस्ट घेतो… हे सगळे अधिकारी आल्यावर पुन्हा दरबार सुरू व्हईल.
क्रमश ः
———-