mushakraj
न्यूज ऑफ द डे मनोरंजन राजकारण

मुषकराज 2022 भाग 7 ईडी

जिल्ह्याच्या सगळ्या अधिकार्‍यांना लिंबागणेशला हजर होण्याच्या सुचना मुषकामार्फत गेल्यानंतर सगळेच अधिकारी बुचकळ्यात पडले. खबर मीडियाच्या प्रतिनिधींनाही लागली. त्यांनी लाईव्ह करण्यासाठी आपल्या ओबी व्हॅन अन् 5 जीचं नवंकोरं सेटअप घेऊन ‘लिंबागणेश लाईव्ह’ म्हणत चॅनेलवर ब्रेकींग सोडल्या. आता या ठिकाणी अक्षरशः ‘पिपली लाईव्ह’चं स्वरूप आलं होतं. सगळे आल्याची वर्दी घेऊन मुषक आतल्या घरात गेले. त्यांनी वामकुक्षीतून बाप्पांना जागं केलं. डोळे उघडताच समोर भिंतीवर एक फोटो टांगलेला होता. त्यात पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याला पडलेल्या भगळीत दोन्ही हात घालून ढव्ळे बापु निर्विकार चेहर्‍यांनं बसल्याचं दिसत होतं. बाप्पांनी फोटोकडे पाहून स्मित केलं. लगोलग तोंडावर पाणी मारत खांद्यावरील उपरण्यानं तोंड पुसलं. अन् डाव्या हातात धोतराचा सोंगा धरत हॉलमध्ये विराजमान झाले…

मुषक : तर गड्यांनो, तुम्ही ह्या ठिकाणी आल्याबद्दल सर्वात पैले तुमचं हृदयदिलसे खुलके स्वागत. हिथं बोलावायचं कारण हेच है की, साक्षात देवबाप्पाच्या जमीनी चोरी व्हायल्यात अन् प्रशासन जागचं हलत पण नैय.. त्यामुळं बाप्पांचा संताप व्हायलाय… मघाशीच ह्या ठिकाणी अनेकांनी जमीनीच्या तक्रारी केल्या हैत. विधायक गजबे साहेब पण लै पोटतिडकीनं आष्टीच्या देवाधर्माच्या जमीनीबद्दल आवाज उठवत व्हते. मला त्येंन्चं भारी कौतूक वाटतंय… त्याचबरूबर मैबुबभै, राम्खाडे, रामनाथ ख्वाड, आपण ज्यांच्या घरी बसलोय ते ढव्ळेबापु ह्यांनाबी बाप्पा इसरणार नैत.

ढव्ळेबापु : (मध्येच मुषकाला थांबवत) मी बोलू का.. मी बोलू? गजबेकाकाचं खरं तर आपल्या सगळ्यास्नी कौतुक असाय पाह्यजे… त्येंनी देवाधर्माचा ईषय मांडलाय… पण मला इथं औचित्याचा मुद्दा उपस्थित करायचा हैय… बाप्पांनी आताच्या आता शिराळा अन् दादेगावच्या रामचंद्र देवस्थानच्या जमीनीचा ‘क्वश्चन’ निकाली काढांव… थोडी थोडकी नाय तर 700 एकर जमीन हैय. इषेस असंय की मोठाल्या दगडांचा भुगा करायच्या मिश्नीबी तिथं हैती…

(धस्कटराव अन् दगडधोंडेसाहेबांनी जोरात टाळ्या वाजवत, ढव्ळेबापुंचा प्रश्न किती महत्वाचाय हे अधोरेखीत केलं)

धस्कटराव : आंन्गं अशी…आता कसा मेन मुद्याला हात घातलाव… ‘आपलं ठेवायचं झाकून अन् लौकायचं पाह्यचं वाकून’ सुंबळूंग डुंबळूंग डुबूक… सुंबळूंग डुंबळूंग डुबूक… कधीन कधी हे पण भायेर येणारंच हैय… आमची तर अशी मागणी हाय की रामचंद्र देवस्थानच्या ह्या जमीनीचा तपास केजचे कर्तव्यकठोर आयपीएस कुमावत साहेबांन्कडं द्यायला पाह्यजेल. एकदम इमानदार माणूस… (आपल्याच हातानी दोन्ही गालावर हलकच मारून घेत अन् थोडी जीभ बाहेर काढत मान हलवत.) आपल्याला ह्या माणसांचा लैच अनुभव हैय… आमच्या मैबुबभैनं कुठून गवसून आणला व्हता ते बाप्पाच जाणो… इथं एकदा गुतलं की मग तुमची ईडीन, बीडीन् काडीन् कैच चलत नैय… इधर फक्त काम की बात…

मैबुबभैय : उल्साक बी ‘निवद’ जमत नाय त्यांना… बाप्पा कायबी करा, पण सगळ्याच जमीनीच्या प्रकरणात येस्पी सायेबांना सांगून त्यांची ईस्पेशल टिम बनवा अन् तपास करा… पैल्या गृहमंत्र्याकडून म्या असंच करून आण्लं व्हतं…

रामनाथ ख्वाड : बाप्पा नामलगावची तुमचीच जमीन चोरांयनी चोरली व्हती. पण लैच हांबळा उठला… अन् लगेच आली की ती जागच्या जागी… पण चोरी ती चोरीच झाली का नाय? मुद्देमाल वापस दिला म्हणून, हिथले अधिकारी म्हणत्यात आता त्यो गुन्हा नाय… तुम्हीच सांगा बाप्पा, असा कायदा जगात तरी कुठं हाय का?

धस्कटराव : औ मैबुबभैय… कशाला उगाच आमच्या गरीबांच्या घरावर घासलेट टाकताय? आता कुठं परबीन दरेकर भौच्या आशीर्वादानी सुखानी झोप्तुय तर तुमचं आपलं कायबी चलतैय… पुन्हा उजूक त्येवच करायचं व्हंय आमी… नका मर्दा… बाप्पा आता आपुन असलं काय बी सैन करणार नैय. नैयतर इथूनच खाली उडी घ्येत अस्तुय…

मुषक : चला चला जमनीचे सगळे परकरणं आता बास… ‘ईडी’चे कुणी अधिकारी आले अस्तील तर जरा पुढं या…

(मुषकाच्या तोंडून ईडी ऐकून आता धस्कटराव, दगडधोंडे, गजबे काका यांची चांगलीच फाटली. सगळ्या बैठकीत एकदम टाचणी पडल अशी शांतता पसरली. आता काय व्हणार म्हणून सगळेच एकमेकांच्या तोंडाकडं पाहू लागले. तेव्हढ्यात तीनचार अधिकारी बाप्पांच्या पुढ्यात आले आणि त्यांनी नमस्कार केला. मुषक त्यांची ओळख करून देऊ लागला.)

मुषक : बाप्पा हे इथल्या ईडीचे कुलकर्णी सैब हैती. अन् हे नागनाथ भौ. एकाकडं पहिली ते सातवीचं खातं है अन् एकाकडं आठवी ते बारवीचं… ह्या दोघांची जादा वळख मनोज जावध करून देतील.

(मघा ईडीचं नाव ऐकून घामाघूम झालेले आष्टीचे तिन्ही मातब्बर बाथरूमला जाऊन येतो म्हणून झटक्यात निघून गेले. पण कोण्यातरी कार्यकर्त्यांनी त्यांना फोन लावून कळविलं माघारी फिरा.. ईडी म्हण्जी ‘इज्यूकेशन डिपार्टमेंट’ हैय. मोदी सायेबांची ईडी नै… तेव्हा कुठं ते घाम पुसत पुसत आपल्या जागेवर येऊन बसले)

मनोज जावध : ह्यांची काय वळख सांगाव बाप्पा? जेव्ढा काय भ्रष्टाचार व्हत असन त्याच्या 70 टक्के भ्रष्टाचार एकट्या ‘ईडी’त व्हतंय. आपुन उगीच पोलीस बदनाम म्हण्तो. एकतर हे ईडीवाले कैच माहिती देत नै. खुद्द आण्णा हजारे आले अन् त्येंनी मरूस्तोवर उपोषण जरी केलं तरी ह्ये त्येंन्लाबी माहिती देणार नैत… लैच निबार लोक हैती… (कुणकर्णी सायेबांनी आपली गळणारी पॅन्ट एकदा उजव्या हातानी वर खेचत मान खाली वरी केली) ह्येन्ला माणुसकीचा थोडाबी वलावा नाय ओ… खुद एका आमदाराच्या साळात त्याच्या पोरा टोरासैत 12-12 लोक फ्रॉड सापडतात. अन् हैनी दिलेल्या परमाणपत्रावर ते आमदार क्रशी मंत्री व्हत्यात. ह्यो किस्सा इथला नाय, सिल्लूडचा सांगतुय तुमाला… पण इथंबी आपल्या बीडात असलंच है… ह्येच डुप्लिकेट काम करणार अन् ह्येच त्यातला मार्ग सांगणार… मोदी सायबांची ‘ईडी’ निदान जेलमधी घालून पुना सोडतीय तरी… पण ही ‘ईडी’ आख्खी पिडी बरबाद करतीये…

राहुल कौठेकर : मनोजराव असं नाय समजायचं… जरा इस्कटून सांगाकी…

मनोज जावध : असं म्हण्ता… इस्कटून सांगू म्हण्ता..? मग एैका…
दाजी त्याच्या मेव्हणीला घेऊन आणि सासर्‍यासाठी बकरी घेऊन एका ओसाड वाटेवरून जात व्हता. काळोख पडला व्हता. दाजी पुढे आणि मेव्हणी मागे…
दाजी!
काय गं?
मला तुमचं भ्या वाटून राहिलंय!
आं! आणि ते का?
ही अशी आडवाट, त्यात काळोख. अवती भोवती कुनीबी न्हाय. आता तुम्ही काई केलं तर?
आगं, माझ्या येका हातात बादली, त्यात सामान, दुसर्‍या हातात रश्शीला बांधलेली बकरी आणि ह्यो एक खुटा. तुझ्याकडं कोंबडी आन पिशव्या. आता मी काय आन कसं करनारे?
आसं कसं म्हंता! ह्यो खुटा जिमिनीत गाडला, त्याला बकरी बांधली. माझ्याकडून कोंबडी हिसकावून घेऊन ती बादलीखाली ठेवली, आन सामान बाजूला ठेवलं की झालं ना हात मोकळं? हितं पाहनारं भी कोनीच न्हाय… (प्रचंड हशा) मला बाई लय भ्या वाटू लागलंया…( प्रचंड हशा)
सेम असलाच कारभारंय ईडीच्या लोकांचा…

मुषक : ऑर्डर ऑर्डर… आता सगळ्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाली हैय. बाप्पांनी एक एक फाईली सोबत घेत्ल्या हैत. सगळ्यास्नी न्याय व्हईल… आता तुमी निश्चिंत आपल्या आपल्या घरी जावा. जाण्याआधी ढव्ळेबापुनी वर अन्नदानाचं ठैवल्लय. कुणीही प्रसाद घेतल्याबिगर जायचं नाय… अन् हे मी सहज नैय तर मुद्दामहून सांगत हैय!

(राजकारणातील सगळी बरबट पाहुन बाप्पा कायच बोल्ले नव्हते. पण प्रसाद भक्षण करून झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेण्याचा निरोप बाहेर थांबलेल्या पत्रकारांना दिला. त्यामुळं बाप्पा काय बोलणार? पत्रकार त्यांना काय काय प्रश्न विचारणार यामुळे पुन्हा एकदा सगळ्याच नेत्यांचे चेहरे काळवंडून गेले होते. या पत्रकार परिषदेनंतर बाप्पा माजलगावकडे रवाना होणार होते.)

– बालाजी मारगुडे
कार्यकारी संपादक दैनिक कार्यारंभ
मो.9404350898

क्रमशः
————

 

 

Tagged