mushakraj

मुषकराज 2022 भाग 8 केशर आंबा

न्यूज ऑफ द डे मनोरंजन राजकारण

केशर आंबा
लिंबागणेशचा दौरा आटोपून मुषकराजांनी बाप्पांना घेऊन आज थेट माजलगाव गाठले. इथे मुक्ताई फाऊंडेशनकडून सुरू असलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची बाप्पांनी आवर्जुन दखल घेत, इतरांना असा आदर्श घेण्याचं आवाहन केलं. यानंतर बाप्पांनी थेट या नगरीचे ईधायक तथा कारखानदार असलेले श्रीमान ‘उजेड’दादा यांचं निवास्स्थान गाठले.

‘उजेड’दादा : या या स्वागत है… आमच्या या गरीब माणसाच्या झोपडीला बाप्पांचे पाय लागले धन्य झालो आम्ही… आम्हाला वाटलं जिल्ह्याचा लैच ताण झाला… याबारीणी माजलगाव इसरताल काय की… तुमचे सगळे दौरे अन् तिथला सगळा वार्तालाप ऐकून आम्ही जरा हापकूनच हैती अजुनबी…

बाप्पा : कसं ईसरणार? मागल्यावर्षीच जरा हुकलं व्हुतं… यंदा इकडंच लॅन्ड व्हायचं व्हतं पण म्हण्लं बगावं तुमाला तरी आमची आठवण येतीय का? अन् इतक्या जल्दी हापकू नका…

‘उजेड’दादा : मुषकराव, तुम्च्या बाप्पाचं नाय काय वाटत होऽऽ तुमीच जरा लैच खुद्य्रा बुद्य्रा करता… इकून तिकडं पळता… आमचं घर म्हण्जी भायेरून काचाचं अन् आतून कापसाचं हैय… काचा फुटल्यावं कवा बी नव्या टाकून घेवू… पण कापसानं एकदा का थिलंगी धरली की मग काय बी इजवाय आणा मग तुमी माजलगाव धरणाचं गेट का उघडैनात… ते इजतच नस्तैय…

मुषक : म्या कशाला थिलंगी घेऊन पळावं… तुम्हीच याबारीणी माकाडांच्या शेपटायला पेटत्या मशाली लावल्यात… जिथं बगाव तिथं मशालीच मशाली हैती. तुम्हाली त्या दिस्णार न्हाईती. कारण मी सत्तेत आलोय, मह्यासंगं कुस्ती खेळाय एकबी पैलवान नाय असं तुम्हास्नी वाटायचं पण रावणालाबी अहंकाराचा असाच मोतीबिंदू झाला व्हता… सत्ता आल्यावर ईकास कामं करायची सोडून तुमी पार ‘बाहुबली’ व्हायला निघाले… पण आता सत्ता गेली अन् तुमचा भल्लाळदेव होऊन बसलाय… यंदा तरी थांबणार हैत की नाय? (झोपेत अंगावरचं पांघरून खासकन ओढल्यानंतर एखाद्याचा जसा चेहरा होतो तसे भाव आता उजेडदादाच्या चेहर्‍यावर उमटत होते. लगोलग मुषकानं सावरून घेतलं) बरं जौवूद्या आता कामाचं बोलू… त्ये भाईर थांबलेली लोक कुजबूज करीत व्हती, यंदा केशर आंब्यात लैच मुनाफा झालैय म्हणं ते खरंय का?

‘उजेड’दादा : एक तर आल्याआल्या तुम्ही मोतीबिंदू काय, बाहुबली काय अन् भल्लाळदेव काय… काय बी समजलं नाय… आता आंब्याची काय सांगाव आतली बात… त्यो पाडळशिंगीचा किरण ननवर्‍या, त्यानं कलेक्टरच्या सरकारी घरातल्या पटांगणातील एका आंब्याच्या झाडाला किती आंबे येतात, त्यात्ले पक्षी किती खात्यात, अन् किती पिक्तात अन् पिकलेल्या आंबा कलेक्टर कुठं इकतात, इकलेल्या पैशाचं पुढं काय व्हतं? असली कायीबायी म्हायीती, म्हायीती अधिकारात मागितली… लोक आता एका एका आंब्याच्या झाडाचं इच्च्यारायलीत… आण्णा हजारेंनी लैच हुशार करून ठिवलेत सगळे… आता तुमाला म्हण्णून सांगतो, आमच्या कारखान्यात नाय म्हण्लं तरीबी 200-400 झाडं अस्तील की… पोपटाने खाल्याले पाड सोडून दिले तरीबी 20-25 लाखाचे आंबे मोक्ळे ईकतात. आता माजलगावचे माणसं चहा पेऊन वरतून आंब्याचा रस हाण्त्यात म्हण्ल्यावर घळघळ 20-25 लाखाचं उत्पन्न कुठंच गेलं नाय की… आता इक्लेल्या पैशाचं काय करता हे बरीक इच्चारू नका… त्यो सभासदांचा पैसा हैय… अन् तुमी आमच्या कारखान्याचे सभासद नाय… कारखानदार कसा कारखाना चालवितंय, त्यात वजन काट्याचं काय? रिकव्हरी किती? असलं कायबी तुम्ही इच्चारणार असाल तर आताच सांगतोय, त्यो कारखानदाराईचा अधिकारंय… तुमच्या बाप्पाचं मस 21 मोदकांत प्वाट भरतं… आता त्येंन्च आम्चं प्वाट दिसायं सारखंय म्हणून तित्क्यातच भरत असंन असं कशावरून?

पत्रकार : (नाकलगावचा एक पत्रकार बाहेरून घोषणा देत) सर्वे नंबर 380 रिकामा झालाच पाहिजे… 30 खोके एकदम ओक्के…

‘उजेड’दादा : अशी कशी रिकामी करायची… त्या लोकांय्नी इतक्या म्हेनतीनं बांधलेली घरं अशी कुणाच्या तक्रारीवर पाडायची म्हंजी..? तिथल्या रहिवाशांना मी शबुद दिलाय एकयेळ हे महाराष्ट्रातलं सरकार पडंल, पण तुमच्या घराची ईटबी ढासळू देणार न्हाय…

मुषक : (बाप्पांच्या कानात) बाप्पा ह्या मंझी ‘मोठ्या मोठ्या बाता अन् निबर लाथा’ झाल्या बगा… आता ह्याच्याच नव्या कोर्‍या हास्पीटलच्या ईमारतीवर बुलडोझर लागतोय की काय अशी येळ आण्लीय त्या नाकलगावच्या पत्रकारानं… तिथली जमीन एकाची… घेतली दुसर्‍यानं, पण तिसर्‍यानंच कुण्या चौथ्याला इकून टाकली, अन् आता बांधकाम करतुय पाचवा… असला कायतरी जांगडगुत्ता झालाय. सध्या लैच लंचाड मागं लाग्लंय त्येंन्च्या. आता माकडीन स्वतः वाचाय बगल का पिल्याला वाचवाय बगन.. तुम्हीच सांगा..?

पत्रकार : औ मुषकराव आमालाबी सांगा की जरा… कवापस्नं बाप्पाच्या कानात कुजबूज करताय..? का तुमच्याबी नावानं तक्रार देऊ… आधीच लै तक्रारी झाल्यात. पत्रकार कमी अन् तक्रारकार म्हणायलेत लोक मला. कोण्त्या तक्रारीची कवा सुनावनी त्ये पण ध्यानात येत न्हाय, त्यामुळं नवं काय मला कराय लावू नका… अन् त्या उजेडबाबाची तर अजिबात भ्याव दावू नका… लहानपणीच मायबापानं मृतकांच्या अंगावर फेकून दिलेल्या पैशाला भोक पाडून ते माझ्या करदुड्यात ओवलाय… त्यामुळं हातापायाची कापलेली नखं पुडीत बांधून फेकून द्यावी, तशी भिती म्या पण फेकून दिलीय…

नामंजूरभैया : (माजलगावचे माजी परथम नारिक सगळे नगरसेवक घेऊन तिथं येतात. ठासून बंदूक भरल्यासारखं धाडधाड ते बोलायला लागतात) बाप्पा आम्हाला वाचवा… आमची लैच म्हंजी लैच बेजारी चाल्लीये… पैलं सहाल चौवूस होतं तवा कवाबी आमचा दिवाळीन दसरा असायचा… आम्ही ह्या उजेडबाबाच्या नादी लाग्लो अन् तवापासून नुस्ता अंधार पडून आयुष्याचा शिम्गा सुरुये… नगर परिषदेची कायी कामं तिकडं बांधकाम विभागाला दिली अन् कायी कामाला भायरून गुत्तेदार मागविलेत… आता हिथले गुत्तेदार नुस्ते ह्येंन्च्या बुथवरच बसाय हायीत का? आम्ही फक्त नारळं फोडाय पुर्तेयत. सारखीच नारळं फोडून फोडून त्याच्या कप्च्यानं बोटं रक्तबंबाळ झालीत… पण आमच्या उजेडबाबाला काय बी दया माया येत न्हाय…भाईरचा गुत्तेदार जितकं बोगस काम करतुया त्यापेक्षा अजून दहापट आमीबी केलं असतं. अन् ज्या कोण्त्या देवाला कुठला ‘निवद’ पाह्यजे त्यो पौच केला असता… यंदा तर नव्या लोकास्नी तिकिट देणार म्हणून फर्मान सुटलंय… आता नवे लोक म्हंजी कोण तर ह्यांन्चं पोरगं अन् ह्यांन्ची सून..?आता सांगा आमी राजकारणात बी नैय म्हणल्यावर करायचं काय..? कारखान्याची इंग्रजी शाळाबी ह्येंच्याकडंच, तिच्या फिसमंदी सभासदाला एकाद रुपाय पण सुट नै, ह्येला काय अर्थय का? कोट्याचं बन्सल क्लास हिथं आले तर त्यात भी ह्यांचा टक्का… माझं तर डोस्कंच काम करायना बगा… ये हमको बिल्कुल ‘मंजूर’ नही हेै…

मुषक : आगा बयोय… मला तर वाटलं फक्स्त माजलगाव धरणाच्या मासेमारीत अन् वाळुतच ठेकाय…

उजेडदादा : अस्सं कस्सं… माजलगाव धरण आमच्या ‘बा’नं बांधलंय… जाऊन इतिहासभुगोल बगा… धरणाला आमी नाव बी देणारंय आमच्या ‘बा’चं… त्याच धरणांतलं पाणी नदीत येतंय… मग वाळू कुणाची अन् त्यातले मासे कुणाचे? उद्या म्हणताल एमआयडीसीत व्हत असलेला वस्त्रोद्योगाचा कारखानाबी आमचा…

नामंजूरभैया : ह्येला काय अर्थय… सुत्रायच्या म्हायीतीनुसार सभासदायची सुतगिरणी दिवाळखोरीत काढली अन् ती कुणी खरेदी केली..? ‘माजलगाव सहकारी औद्यागिक वस्त्रोद्योग’.. म्हंजीच तुमच्या पोरानं… मग त्येबी वस्त्रुउद्योग कारखाना आमचाच… म्हंजी सुतगिरणीच्या सभासदांचाच हैकी…

– बालाजी मारगुडे
कार्यकारी संपादक दैनिक कार्यारंभ
मो.9404350898

क्रमशः
———-

Tagged