pankaja munde and dhananjay munde

…पंकजाताईंसोबत मी खूप जुळवून घेण्याचा प्रयत्न केला…

न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

बीड : 2009 च्या आगोदर पंकजाताईसोबतचं माझं नातं अतिशय चांगलं होतं. प्रत्येक सुख दुःखात आम्ही दोघे बहीण भाऊ सोबत होतो. मी माझ्या सख्ख्या बहीणींकडून कधी राखी बांधून घेतल्याचे त्यावेळी मला आठवत नाही. परंतु पंकजाताईंकडून प्रत्येक वर्षी राखी बांधत होतो. माझ्या घरातून तसं सांगितलं जात होतं की आधी पंकजा, प्रीतम आणि नंतर माझ्या सख्ख्या बहीणी… स्व.मुंडे साहेब आणि स्व.पंडितआण्णा गेल्यानंतर घरातला मोठा म्हणून मी अनेकदा प्रयत्न केले की घर एकत्रित असायला हवं. भलेही घरात दोन राजकीय विचार असू देत. निवडणुका ऐकमेकांच्या विरोधात लढवू देत. परंतु घरातील सुख, दुःखात आपण एकत्र असायला हवं. मी एकत्र येण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण मला त्यात यश आलं नाही. घर म्हणून जो संवाद असायला हवा तो आता आमच्यात नाही, असे भावूक उद्गार ना.धनंजय मुंडे यांनी काढले.


एका मराठी वृत्तपत्राच्या फेसबूक मुलाखतीत ते बोलत होते. ना. मुंडे म्हणाले की, तो कौटुंबिक दुःखद क्षण मी कधी विसरू शकत नाही. जेव्हा मुंडे साहेबांच्या निधनाची वार्ता मला कळाली होती त्यावेळी मी दिल्लीला गेलो होतो. अध्या रस्त्यात असतानाच त्यांचं पार्थिव विमानतळाकडे आणण्यात आलं होतं. त्यावेळी मी त्या पार्थिवासोबत येण्याचा प्रयत्न केला. परंतु मला तसे करू दिले नाही. तो क्षण माझ्यासाठी खूप वेदानादायी होता. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन मला शेवटपर्यंत घेता आलं नाही, ही दुःखद वेदना ना.मुंडे यांनी बोलून दाखवली.

ना. मुंडे यांनी लहानपणीच्या आठवणी सांगताना सांगितले की माझ्या सर्वात लहान काकांनी मला शोले चित्रपट दाखवायला परळीला खांद्यावर बसवून नेलं होतं. त्यावेळी सिनेमागृहात बाकडे नसायचे. तेव्हा त्यांनी मला त्यांच्या खांद्यावर बसवून अख्खा पिक्चर दाखवला.

तो दिवस नसता आला तर बरे झाले असते…
जेव्हा अजितदादा आणि देवेंद्रजींचा शपथविधी झाला त्यावेळी मी आधीच सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की मला आराम करायचा आहे आणि मला त्याची खूप गरज आहे. तेव्हा मी काही गोळ्या खाऊन झोपले. आणि जेव्हा मला दुपारी 2 च्या सुमारास जाग आली त्यावेळी खूप काही घडून गेलं होतं. तोपर्यंत माझ्याविषयी बरेच समज-गैरसमज झाले. मला वाटतं तो दिवस टळला असता तर बरं झालं असतं, असे ना.धनंजय मुंडे यांनी या मुलाखतीत सांगितले.

मोठ्या नेत्यांच्या सभा ऐकून कधी
त्या व्यासपीठावर गेलो कळलेच नाही

स्व.प्रमोदजी महाजन, स्व. गोपीनाथजी मुंडे, स्व.आर.आर पाटील या वक्त्यांच्या सभा मी मन देऊन ऐकत असायचो. सभा ऐकत, पाहत कधी त्या वक्त्यांच्या व्यासपीठावर जाऊन बसलो हे मला देखील समजले नाही, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात ना.धनंजय मुंडे म्हणाले.

या मुलाखतीचा शेवट करताना धनंजय मुंडेंनी
एक कविता देखील वाचून दाखवली त्या ते म्हणतात….
मित्र कोण आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही..
नाही भेटला कोण असा
ज्याने मला छळले नाही…
सुगंध सारा वाटीत गेलो
मी कधीच दरवळलो नाही..
ऋतू नाही असा कोणता
ज्यात मी होरपळलो नाही..
केला सामना वादळाशी
त्याच्या पासून पळालो नाही..
सामोरा गेलो संकटाना
त्यांना पाहून वळलो नाही..
पचऊन टाकले दु:ख सारे
कधीच मी हळहळलो नाही..
आले जीवनी सुख जरी
कधीच मी हुरळलो नाही..
कधी ना सोडली कास सत्याची
खोट्यात कधीच मळलो नाही…
रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच
मी कुणाला कळलोच नाही…..!

Tagged