कापूस 8500 तर सोयाबीन 7100 रूपये प्रतिक्विंटल

बीड शेती

शेतमालाच्या दराने मारलेल्या उसळीने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत


सय्यद दाऊद । आडस
दि. 26 : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन घटले तर नगदी पीक समजले जाणारे कापूस आणि सोयाबीनच्या दराची घसरण पाहता शेतकरी चिंताग्रस्त होते. परंतु आठवडाभरात दर चांगलेच वधारले. शुक्रवारी (दि.26) येथील विश्वतेज जिनींग प्रेसींग येथे 8 हजार 500 रूपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केली. लातूर मार्केटमध्ये उच्च दर्जाच्या सोयाबीनला 7 हजार 100 प्रति क्विंटल दर मिळाला. आणखी दरवाढ होईल असा अंदाज वर्तविण्यात येत असून वाढते दर पाहता शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


गेल्या हंगामात सोयाबीन प्रतिक्विंटल 11 हजार रुपयेच्या पुढे गेल्याने यावर्षी खरीप हंगामात शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकाला पहिली पसंती दिली. त्यामुळे कापसाला मागे टाकत सोयाबीन नंबर एकचे पीक ठरले. सुरवातीला पाऊस वेळेवर पडल्याने सोयाबीन जोमात आले. परंतु, फुले लागत असताना पावसाने ओढ दिली. तसेच, शेंगा लागल्यानंतर अतिवृष्टी झाली. याचा मोठा फटका बसून उत्पादन घटले. दर चांगला असल्याने हे नुकसान भरून निघेल अशी शेतकर्‍यांना आशा होती. परंतु शेतकर्‍यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात करताच केंद्र शासनाने तेल आयातीवरील कर घटवले, सोया पेंड आयात केली. परिणामी, सोयाबीनचे दर कोसळायला सुरुवात झाली. 11 हजारांवर असलेले दर 4 हजार 800 ते 5 हजारांवर आले. अतिवृष्टीमुळे घटलेले उत्पन्न आणि कोसळणारे दर पाहता शेतकरी चिंतेत होता. दर वाढतील या आशेवर 70 टक्के शेतकर्‍यांनी सोयाबीनचे खळे करुन माल घरातच साठवून ठेवला. शेतकर्‍यांचा अंदाज खरा ठरत असून मागील सात-आठ दिवसांपासून सोयाबीन दरात वाढ होत आहे. शुक्रवारी (दि.26) लातुरच्या बाजारपेठेत प्रतिक्विंटल 7 हजार 100 तर, पोटली सोयाबीन 6 हजार 550 असा दर मिळाला आहे. आडस येथील व्यापार्‍यांनी सोयाबीन 6 हजार 700 दराने खरेदी केली. लातुरनंतर सांगली सोयाबीनची राज्यातील मोठी बाजारपेठ आहे. तेथेही शुक्रवारी सोयाबीन 7 हजार 50 रूपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला.


तर पांढरं सोनं म्हणून ओळखले जाणारे कापसाचे यंदा उत्पादन घटले आहे. उत्पादनाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने सुरवातीपासून यावर्षी कापसाला साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वाढत जाऊन तो 9 हजारांवर पोहोचला होता. तर दिवाळीमध्ये कापसाचे दर घसरत 7 हजार 500 रूपयांपर्यंत खाली आले. मागील आठवड्यापासून कापसाचे दर वाढत असून 7 हजार 800 रूपयांवर पोहचलेल्या कापसाला शुक्रवारी (दि.26) 8 हजार 500 असा दर मिळाला. मागील आठवड्यापासून सोयाबीन, कापसाच्या दरांनी घेतलेली उसळी पाहता शेतकरी समाधान व्यक्त करत, असून अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरुन निघेल अशी आशा असल्याचे सांगत आहेत.

Tagged