सतीश चव्हाण यांचा दणदणीत विजय

बीड

औरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे पहिल्या पसंतीची १ लाख १६ हजार ६३८ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार शिऱीष बोराळकर यांचा तब्बल ५७ हजार ८९५ मतांनाी पराभव केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाडा पदवीधर मतदारसंघावरील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.

चव्हाण हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. ते पाचव्या आणि अखेरच्या फेरीपर्यंत कायम आघाडीवरच राहिले. पाचव्या फेरीअखेर भाजपचे शिरीष बोराळकर यांना ५ ८ हजार ७४३ मते मिळाली. भाजपला मिळालेली ही मते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या तुलनेत अगदी निम्मीच आहेत.

चौथ्या फेरीचे निकाल हाती आले असून चौथ्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना १ लाख ७ हजार ९१६ मते मिळाली. तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना केवळ ५४ हजार ३०५ मते मिळाली. सतीश चव्हाण यांनी भाजपचे बोराळकर यांच्यावर तब्बल ५३ हजार ६ ११ मतांची आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरीत सतीश चव्हाण यांना ८ हजार ७२२ तर बोराळकर यांना ४ हजार ४३८ मते मिळाली. पाचव्या फेरीअखेर सतीश चव्हाणांना मिळालेली एकूण मते १ लाख १६ हजार ६३८ वर पोहोचली तर बोराळकरांना मिळालेल्या मतांची गोळाबेरीज ५८ हजार ७४३ मतांवरच थांबली.

विशेष म्हणजे भाजपने मराठवाड्यातील मराठा मते फोडण्यासाठी रमेश पोकळे यांना अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्यास भाग पाडले होते. परंतु पोकळे यांना केवळ ६ हजार ६२२ मते मिळाली. त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे ११ हजार ६४ मते प्रहारच्या सचिन ढवळे यांनी स्वतःकडे खेचली आहेत. विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासूनच सतीश चव्हाण हे आघाडीवर होते. तर भाजपचे बोराळकर हे प्रत्येक फेरीत त्यांच्यापेक्षा निम्म्या मतांवरच होते. एकाही फेरीत ते चव्हाणांना मात देऊ शकले नाहीत.
निवडणूक सुशिक्षित पदवीधर मतदारांची होती तरीही चार फेऱ्यांत एकूण २१ हजार ३८८ मते बाद झालेली आहेत. पहिल्या फेरी ५ हजार ३८१, दुसऱ्या फेरीत ५ हजार २६०, तिसऱ्या फेरीत ५ हजार ३७४ आणि चौथ्या फेरीत ५ हजार ३४४ मते अवैध ठरली. अवैध मते वगळता पहिल्या फेरीत ५६ हजार १, दुसऱ्या फेरीत ५६ हजार, तिसऱ्या फेरीत ५६ हजार आणि चौथ्या फेरीत ५६ हजार अशी एकूण २ लाख २५ हजार ७४ मते वैध ठरली.

Tagged