यंत्रणेअभावी कालव्यात वाहून गेलेल्या महिलेचा शोध लागेना

क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा

पैठण येथील घटना; घातपाताचा संशय

पैठण येथील घटना; घातपाताचा संशय
पैठण : येथील डाव्या कालव्याच्या पाण्यात रेखा अक्षय सोनवणे (वय 21 रा.तुळजापूर) ही महिला वाहून गेली होती. येथील पोलिसांकडे सक्षम शोध कार्याची यंत्रणा नसल्यामुळे शोध होऊ शकलेला नाही. दरम्यान, महिलेचा मृत्यू प्रकरणात आता घातपाताचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

 पोलिसांच्या माहितीनुसार, सदरील महिला नेहमीप्रमाणे आपल्या शेतालगतच्या डावा कालवा (पाटावर) पाणी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी ती वाहून गेली. या घटनेची खबर पैठण पोलीस ठाण्यात मिळताच बीट जमादार सुधीर ओव्हळ, पो.ना. लक्ष्मण बोराडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कालव्याला जास्त पाणी वाहत असल्याने महिलेचा शोध घेणे कठीण होते. तरीही त्यांनी ग्रामस्थांसोबत शोध कार्य सुरू केले. मात्र महिलेचा मृतदेह सापडू शकला नाही. शुक्रवारी पुन्हा वडीगोद्रीपर्यंत तपास सुरू असल्याची माहिती बीट जमादार सुधीर ओव्हळ यांनी दिली. परंतु पैठण पोलीस ठाण्यात शोध कार्य करण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्यामुळे अद्यापर्यंत या महिलेचा मृतदेह सापडू शकलेला नाही. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या पथकाला देखील पाचारण केले नसल्याचे स्पष्ट माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

सासरच्या मंडळीविरोधात देणार तक्रार
मयत महिलेचा सासरच्या मंडळीकडून हुंड्याच्या पैशासाठी नेहमी शारीरिक छळ केला जात होता. गुरुवारी रेखा व पती अक्षय या दोघांत भांडण झाले होते. त्यातूनच मुलीचा मृत्यू झालाचा संशय रेखाचे वडील विष्णू काळे (रा.कुतुबखेडा ता.पैठण) यांनी पोलीस ठाण्यात व्यक्त केला आहे. परंतू पोलिसांनी आधी शोध होऊ द्या मग आपली तक्रार घेण्यात येईल असे सांगितल्यामुळे शोध झाल्यानंतर सासरच्या मंडळीनी विरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याची माहिती प्राप्त झाली.

Tagged