यु -ट्यूब चॅनलच्या नावाखाली खंडणी मागणार्‍या पत्रकारांविरूद्ध गुन्हा दाखल

न्यूज ऑफ द डे बीड

अंबाजोगाईसह जिल्ह्यात यु-ट्यूब चॅनलवाल्यांचा सुळसूळाट

अंबाजोगाई : तू शासकीय काम नीट करत नाही, महिन्याला 10 हजार रुपये दे नसता तुझ्या बातम्या दाखवतो असे धमकावत टेबलवरील रजिस्टर फेकून देत थेट कॉलर पकडून शासकीय कर्मचार्‍यास पत्रकार व कॅमेरामन असं सांगणार्‍या दोघांनी मारहाण केल्याची घटना येथील पंचायत समिती कार्यालयात गुरुवारी घडली. याप्रकरणी दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा, मारहाण व खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   परमेश्वर सोनवणे (पत्रकार सांगणारे, रा.डिघोळअंबा ता.अंबाजोगाई), यशवंत सोनवणे (कॅमेरामन सांगणारे) असे आरोपींची नावे आहेत. हे दोघे येथील पंचायत समिती कार्यालयात गेले. तेथे दुपारी 3 वाजता कार्यरत असलेल्या कनिष्ठ आरेखक संतोष काळे यांना तु शासकीय काम नीट करत नाहीस. महिन्याला 10 हजार रूपये दे नसता तुझ्या बातम्या दाखवतो असे म्हणाले. यावेळी कार्यालयात अन्य कर्मचारी देखील उपस्थित होते. पैसे देऊ शकत नाही असे म्हणताच काळे यांच्यासमोरील रजिस्टर परमेश्वर सोनवणे याने फेकून दिले. व आरोपींनी दोघांनी मिळून मारहाण सुरु केली. उपस्थित सहायक गटविकास अधिकारी विवेकानंद कराड, कक्ष अधिकारी निळकंठ दराडे यांनी भांडणे सोडविले. त्यांना देखील यापूर्वी अनेकदा पैशाची मागणी करण्यात आलेली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. काळे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा, मारहाण व खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.

अंबाजोगाईसह जिल्ह्यात यु-ट्यूब चॅनलवाल्यांचा सुळसूळाट
ब्लॅकमेलिंग करणार्‍या व खंडणीखोरांपासून सावध राहा. तसेच माध्यमांच्या नावाखाली गैरवापर होत असल्यास सामान्य नागरिकांनीही त्याविरोधात आवाज उठवायला हवा. त्याशिवाय यु-ट्यूब चॅनलवाल्यांचा सुळसुळाट थांबवणार नाही. तसे आवाहन अनेक पत्रकार संघटनांनी देखील केले आहे.

Tagged