स्थानिक गुन्हे शाखेने केल्या 31 दुचाकी जप्त !

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.25 ः शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. मागील काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा या चोरट्यांच्या मागावर आहे. महिन्याभरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात आरोपींना अटक करत दुचाकीही जप्त केल्या आहेत. शनिवारी (दि.24) गुप्त माहितीच्या आधारावर दुचाकीवर डल्ला मारणार्‍या टोळीतील सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून 31 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
बीड शहरासह ग्रामीण भागात होत असलेल्या दुचाकी चोरीने त्या त्या भागातील पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. गेल्या महिनाभरापासून स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील दुचाकी चोरीच्या टोळीचा माग घेत होते. गेल्या आठ दिवसांपुर्वीच 24 दुचाकी चोरट्यांकडून हस्तगत केल्या होत्या. दोन चोरट्यांच्याही मुसक्या बांधल्या होत्या. मात्र जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील दुचाकी चोरीचा आकडा हा मोठा असल्याने एलसीबीची टिम या चोरट्यांच्या मागावर होती. शनिवारी वैभव संजय वराट, सुयोग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान, संदिप उर्फ बबल्या हरीभाऊ कानडे, राजु मसू गोरे, तेजपाल विलास डोंगरे, बालाजी जिवनराव झेंडे, या सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 31 दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांची चौकशी सुरु असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत व त्यांच्या टिमने केली आहे.

Tagged