भगवान भक्तीगडाच्या विकासाची अपूर्ण कामे तातडीने पुर्ण करा

न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड

बीड : राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगांव (ता.पाटोदा) येथील भगवान भक्तीगडावरील विकास कामांसाठी आपण मंत्री असताना 2 कोटी 35 लाख रूपये इतका निधी मंजूर केला होता. या निधीतील विकासाची अनेक कामे अद्याप पुर्ण झाली नाहीत. ही अर्धवट राहिलेली कामे तातडीने पुर्ण करावीत तसेच दसर्‍यापूर्वी मंदिराचे काम पुर्ण करावे आणि यासंदर्भात आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलवावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना एका पत्राद्वारे केली आहे.

सावरगाव (ता.पाटोदा) येथे ‘भगवान भक्तीगडाची’ उभारणी झालेली आहे. या ठिकाणी राष्ट्रसंत भगवानबाबा यांची भव्य मुर्ती तसेच ध्यान मंदिर व स्मारकाचे काम पुर्ण झालेले आहे. मराठवाडयासह महाराष्ट्रातील ऊसतोडणी मजूरांचे श्रध्दास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून या गडाकडे पाहिले जाते. ऊसतोड कामगारांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टातून (वर्गणीतून) ‘भगवान भक्तीगडा’ची उभारणी झाली आहे. ‘भगवान भक्तीगड’ येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात व एका आगळ्यावेगळ्या पध्दतीने विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. येथे विजयादशमीला भाविकांचा मोठा उत्साह असतो. राज्याच्या कानाकोपर्यातून व बाहेरून अनेक जाती धर्माचे व पंथाचे भाविक येथे दर्शनाला येत असतात. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने शासन निर्णय क्र. विकास-2019/प्रक्र 165/ भाग-1/ यो-6, दि. 11 सप्टेंबर 2019 चे यादी मधील अ.क्र. 662 व अ.क्र. 664 अंतर्गत ‘भगवान भक्तीगडाचे’ सुशोभिकरण करणेसाठी 2 कोटी व राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मस्थळाचे सुशोभिकरण करणेसाठी 35 लाख असे मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी एकुण 2 कोटी 35 लाख रुपयांची कामे मंजूर केलेली होती. यातील बरीचशी कामे दुष्काळ आणि पाण्याच्या अभावी अर्धवट राहिली आहेत. आता ती निधी मंजूर असलेली कामे सुरू करून दस-याच्या अगोदर मंदिर सुशोभिकरणाचे सर्व कामे पुर्ण करणे आवश्यक आहेत. सदर कामे पूर्णत्वास नेण्यासाठी एक बैठक तात्काळ घेऊन त्यात या कामांचा आढावा घ्यावा तसेच उर्वरित सर्व कामांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पंकजाताई मुंडे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

Tagged