आम्ला ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

बीड

लोकप्रतिनीधींचेही दुर्लक्ष; ग्रामस्थांनी कुणाकडे जावे

 तलवाडा  दि.22 :  मागील काही दिवसांपासून सतत वरुणराजा बरसत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या होतातोंडाशी आलेले पिके वाया गेली असून अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटत आहे. गेवराई तालुक्यातील आम्ला गावाला जाणार्‍या रस्तावर भेंड टाकळी जवळ तसेच वाहेगावहून आम्ला येथे जाण्यासाठी पाण्यातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या कडे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
      यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे. मात्र काही दिवसापासून पावसाची उघडीप होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी गावांना जोडणारे रस्ते हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. लहान मुले, वयोवृद्ध, महिला यांना ये-जा करण्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. या काळात पर्यायी रस्ते ही बंद होतात. गेवराई तालुक्यातील अनेक गावाना आज ही पक्के रस्ते नाहीत. अनेक रस्ते झाले परंतु काम खराब असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आम्ला हे गाव ही याला अपवाद नाही आम्ला येथील नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या गावाला जाणार्‍यांना जातेगाव फाटा येथून भेंड टाकळी तसेच वाहेगाव मार्गे आम्ला जाणार्‍या रस्त्यावर टाकळी व वाहेगाच्या जवळ ओढ्यातुन जावे लागते. ज्या ठिकाणी चार ते पाच फुटापर्यंत पाणी असते. त्या मुळे तेथून जाणे येणे बंद होते. अनेकांना आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक कामासाठी प्रवास करावा लागतो. या ओढ्याला कमी जास्त पाणी आल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे या ठीकाणी पुल होण्याची गरज आहे. यासाठी ग्रामस्थांकडून लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावाही सुरु आहे. परंतू याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

खासदार, आमदार कुणी तरी लक्ष द्या !
खासदार, आमदार कुणीतरी वाहेगाव येथील ओढ्यावर पुल बांधण्यासाठी लक्ष द्यावे. कोरानामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यानांही याच ओढ्यातून जीवघेणा प्रवास करावा लगतो. त्यामुळे हा पुलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लागण्याची गरज आहे.
 

Tagged