varsha gaikwad

शाळा सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव

बीड

मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
बीड, दि. 19 : कोरोनाच्या संसर्गामुळे बंद करण्यात आलेल्या शाळा सोमवारपासून सुरु करण्याच्या हालचाली राज्य पातळीवर सुरु झाल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच या संदर्भात माहिती दिली.

त्या म्हणाल्या, तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला. त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव सादर केला आहे. येत्या सोमवारपासून शाळा सुरु कऱण्याचा विचार करावा असं प्रस्तावात सांगण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेतला जावा. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली असून सकारात्मक प्रतिसाद येईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. निर्णय आल्यानंतर शाळा सुरु करण्यासंबंधी प्रक्रियेला सुरुवात होईल. स्थानिक परिस्थिती पाहूनच निर्णय व्हावा अशीच आमचीही इच्छा आहे. याशिवाय 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण व्हावं यावर आमचा भर असणार आहे. त्यामुळे शालेय स्तरावर येऊन लसीसकरणाची विनंती केली आहे. तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनीही लस घेऊनच शाळेत यावं असंही सांगणार आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

प्रस्तावात काय आहे?
शहर आणि ग्रामीण भागातील पहिली ते 12 वी अशा सर्व शाळांचा उल्लेख प्रस्तावात आहे. तसंच प्री प्रायमरी शिक्षण यांचाही विचार केला आहे. तेथील स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे. करोनाच्या सर्व नियमांचं पालन करुनच शाळा सुरु करायच्या आहेत. त्यांना सर्व नियोजन करावं लागणार आहे. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण गेलं पाहिजे हेच मुख्य लक्ष्य आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. मुलांचं आरोग्य आणि सुरक्षा याकडे लक्ष दिवं जावं असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.

Tagged