बीड एसीबीची कारवाई
बीड दि.20 : वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक व एका खाजगी एजंटवर बीड एसीबीने गुरुवारी (दि.20) कारवाई केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरटीओ कार्यालयात झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात वसुली होत असल्याचे आरोप नेहमी होत होते.
रविकिरण नागनाथ भड (वय 32, मोटर वाहन निरीक्षक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बीड मुळ रा.गौडगाव ता.बार्शी जि. सोलापूर ह.मु.धनचंद्र निवास,चौरे इस्टेट,जालना रोड, बीड) व एजंट प्रवीण सिताराम गायकवाड (रा. गौतम बुद्ध कॉलनी,शाहूनगर,बीड) असे पकडलेल्या लाचखोरांची नावे आहेत. त्यांनी 19 आक्टोबर 2021 तक्रारदाराकडे वाहनांची तपासणी करून वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी, पोलीस अमंलदार श्रीराम गिराम, भारत गारदे, अमोल खरसाडे, चालक म्हेत्रे या टीमने केली आहे.